Join us

२१ जणांना मिळाले जीवनदान

By admin | Published: March 01, 2015 12:29 AM

गरजू व्यक्तींना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरूपाने जिवंत राहू शकतो, ही संकल्पना आता अनेकांच्या मनात रुजू लागली आहे.

मुंबई : गरजू व्यक्तींना जीवनदान देऊन मृत्यूनंतरही अवयवरूपाने जिवंत राहू शकतो, ही संकल्पना आता अनेकांच्या मनात रुजू लागली आहे. मुंबई शहरात दोन महिन्यांमध्ये झालेल्या सात कॅडेव्हर डोनेशनमुळे २१ जणांना जीवनदान मिळाले आहे. २५ फेब्रुवारी रोजी पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ६१वर्षीय पुरुषाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलींनी पुढाकार घेऊन किडनी आणि यकृत दान केल्यामुळे तीन जणांना जीवनदान मिळाले आहे. पवई येथे राहणारे सोमनाथ पाल (६१) यांना १४ फेब्रुवारी रोजी हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्यावर लहान शस्त्रक्रिया करण्यात आली होती. उपचारादरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पाल ब्रेनडेड आहेत का पाहण्यासाठीची पहिली तपासणी करण्यात आली. यानंतर रात्री १२.४५ वाजता त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यांचे इतर अवयव कार्यरत असल्यामुळे पाल यांचे अवयव दान करता येऊ शकतात, असे डॉक्टरांनी पाल यांच्या पत्नी आणि मुलींना सांगितले. पाल यांची एक किडनी हिरानंदानी रुग्णालयातील प्रतीक्षा यादीत असलेल्या रुग्णाला देण्यात आली असून, दुसरी किडनी जसलोक रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आली. तर यकृत कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले असल्याची माहिती हिरानंदानी रुग्णालयाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)च्पालांनी नेहमीच दुसऱ्यांना मदत केली. अवयवदानाविषयी ऐकले आहे. त्यांच्या अवयवामुळे गरजूला जीवनदान देऊ शकणार असतील तर आम्हाला चालेल. त्यांना आवयक असणारे इतरही अवयव दान करू, असे त्यांच्या पत्नीने सांगितले. यानंतर पाल यांच्या दोन्ही किडनी आणि यकृत दान करण्यात आले.