नोकरीसाठी २१ हजार परीक्षार्थी
By admin | Published: July 5, 2014 12:07 AM2014-07-05T00:07:52+5:302014-07-05T00:07:52+5:30
विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ५ जुलै रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
ठाणे : विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ५ जुलै रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी ठाणे विभागातून २१ हजार १६२ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. ठाणे शहरातील २५ शाळांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.
या परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या जास्त आहे. शाळाही नुकत्याच सुरू झाल्या असल्यामुळे शाळांचे वेळापत्रक लक्षात घेऊन सकाळ व दुपार या दोन सत्रांत ही लेखी परीक्षा ठाणे विभागासह नाशिक, अमरावती, नागपूर या विभागांमध्ये एकाच वेळी घेतली जाणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक ज्ञान, गणित आदी विषयांचीही लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
अधीक्षक- स्त्री, पुरुष, उपलेखापाल, गृहपाल- स्त्री-पुरुष, वरिष्ठ लिपिक, संशोधन सहायक आणि आदिवासी विकास निरीक्षक आदी रिक्त पदांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी ठाणे शहरात घेतली जाणारी लेखी परीक्षा सकाळ व दुपारच्या सत्रांत घेतली जाणार आहे. सकाळच्या सत्रात ११ हजार ६३६ विद्यार्थी व दुपारच्या सत्रात नऊ हजार ५२६ विद्यार्थी परीक्षार्थी असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक मिसाळ यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)