सोशल मीडियावर मैत्री करुन १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतून आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:09 PM2024-08-22T19:09:56+5:302024-08-22T19:16:28+5:30
बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
Mumbai Crime : बदलापूर प्रकरणामुळे सध्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बदलापुरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरमध्ये नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत नागरिक रस्त्यावर उतरले होते. नागरिकांकडून १० तास बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आलं. या घटनेनंतर राज्यभरात अत्याचारी आणखी प्रकरणं उघडकीस येत आहेत. अशातच मुंबईत एका १३ वर्षांच्या मुलीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करुन बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
सोशल मीडियावरुन झालेल्या मैत्रीतून मुंबईतल्या २१ वर्षीय तरुणाने १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाकोला पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला गोरेगाव येथून त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा हॉटेलमध्ये काम करणारा असून पीडित मुलीसोबत त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. मैत्रीनंतर त्या दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला अंधेरीतील एका ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी आरोपी मुलीला गावी जायचे आहे सांगून गुजरातला घेऊन गेला. गुजरातमध्हीये आरोपीने तिच्यावर आणखी तीन वेळा बलात्कार केला.
दुसरीकडे, १५ ऑगस्टच्या रात्री पीडित मुलगी बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला मात्र ती सापडली नाही. काही दिवसांनी मुलगी स्वतःहून घरी परतली. गायब झाल्यानंतर घरी परतल्यानंतर पीडित मुलगी शांत शांत होती. घरच्यांनी तिची चौकशी केली तेव्हा तिने घडलेला प्रसंग सांगितला. मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटोंच्या आधारे कुटुंबीयांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्यांनी पीडितेला जवळच्या पोलीस ठाण्यात नेले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन आरोपीला अटक केली.