मुंबई : कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नावे लोकल डब्यात आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांकडून पैसे उकळले जातात. अशा टोळक्यांविरोधात मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) कठोर कारवाईसाठी नुकतीच विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या गुन्ह्यात प्रथमच २१ वर्षीय तरुणीला तीन दिवसांची कोठडी देण्यात आल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. मेल-एक्स्प्रेस, लोकलमधील डब्यात फिरून व रेल्वे स्थानकात घोळक्याने उभे राहून अनेक तरुण-तरुणी कॅन्सरग्रस्तांच्या नावे पैसे गोळा करतात. एखाद्या संस्थेच्या नावाचे ओळखपत्र गळ्यात अडकवून व सोबत दानपेटी घेऊन कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी प्रवाशांना मदत करण्याचे आवाहन केले जाते. २४ एप्रिलपासून कॅन्सग्रस्तांच्या नावाने पैसे उकळणाऱ्यांविरोधात १५ दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. यात आठ केसेसची नोंद झाली आहे. याबाबत मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले की, अस्तित्वात नसलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या नावे पैसे गोळा करण्याचे काम केले जात होते. अशा कारवाया यापुढेही टप्प्याटप्प्यात घेऊन त्याला आळा घालण्यात येईल.
२१ वर्षीय तरुणीला तीन दिवसांची कोठडी
By admin | Published: April 13, 2016 2:54 AM