Shiv Sena Vs BJP: २१ वर्ष कट्टर शिवसैनिकाची उद्धव ठाकरेंवर नाराजी! पक्षाला रामराम, भाजपमध्ये केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 04:17 PM2022-09-08T16:17:42+5:302022-09-08T16:19:13+5:30
Shiv Sena Vs BJP: २१ वर्ष शिवसेनेसाठी वाहून घेत १५ हजार कार्यकर्त्यांसोबत काम करुन मोठे प्रभाव क्षेत्र निर्माण करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाने अखेर भाजपचे कमळ हाती घेतले.
मुंबई: राज्यभरातून एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यामुळे उद्धव ठाकरेंवर नाराज असलेल्या एका कट्टर शिवसैनिकाने अखेरीस पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
२१ वर्षांपासून शिवसेना आयटी सेलचे प्रमुख आणि गुजरात राज्याचे संपर्क प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या रमेश सोळंकी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेने काँग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, तेव्हाच सोळंकी यांनी युवासेना-शिवसेनेच्या पदावरुन राजीनामा दिला होता. मात्र आता त्यांनी अधिकृतपणे भाजपत प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोळंकी यांनी हाती कमळ घेतले.
भाजप सन्मानाने चांगले काम देईल, असे आश्वस्त करतो
रमेश सोळंकी हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत. २१ वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. मुंबईत १५ हजार कार्यकर्त्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यांचे मोठे प्रभावक्षेत्र राहिले आहे. सोळंकी यांनी भाजपत पक्ष प्रवेश केला. पक्ष वाढीस ते अहोरात्र मेहनत घेतील, अशी अपेक्षा आहे. भाजप त्यांना सन्मानाने चांगले काम देईल असे मी आश्वस्त करतो, असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.
दरम्यान, मागील दोन महिन्यापासून शिवसेनेला लागलेली नेत्यांची गळती थांबण्याचे चिन्हे नाही. शिंदे गटासोबतच आता शिवसेनेतील उद्धव ठाकरेंसोबतचे नेते भाजपत प्रवेश करत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या महाप्रबोधन यात्रा दौऱ्यापूर्वीच अमरावतीचे जिल्हाप्रमुख राजेश वानखेडे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. शिंदे गटात जाणे म्हणजे शिवसेनेच्या वेगळ्या गटात जाण्यासारखे आहे. त्यामुळे मतदारसंघातील लोकांचा विचार करता ज्यांनी मागच्या निवडणुकीत मला ६६ हजार मतदान केले त्यांची इच्छा आहे आपण भाजपत गेले पाहिजे. भाजप हिंदुत्ववादी पक्ष आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे सर्वानुमते शिवसैनिकांसह भाजपत प्रवेश असल्याचे वानखेडे यांनी स्पष्ट केले.