मुंबई - विधानसभा निवडणूक – 2019 साठी मुंबई शहर जिल्हयांतर्गत असलेल्या १० विधानसभा मतदार संघासाठी 21 हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच निवडणूका पारदर्शी, नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा कर्मचारी नियुक्ती विभागाचे समन्वयक संपत डावखर यांनी दिली.
मुंबई शहर जिल्हयात धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा असे 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकारी ते निवडणूक विषयक यंत्रणा हाताळणारे सर्व विभागाचे वेगवेगळे अधिकारी व कर्मचारी असे सर्व मिळून जवळपास 21 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, शिपाई तसेच या सर्वांना सहकार्य करण्यासाठी 1200 कार्यालयीन कर्मचाऱ्यांची विधानसभा मतदारसंघ निहाय नेमणूक करण्यात आली आहे.
गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व आजारी कर्मचाऱ्यांना वगळले-
निवडणूकीचे काम हे अतिशय महत्वाचे असुन या कामात गैरहजर राहणाऱ्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. प्रथम प्रशिक्षणाला अनुपस्थित असलेल्या जवळपास 2350 अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द कार्यवाही केली आहे. तसेच जे कर्मचारी अधिकारी आजारी आहेत व त्यांनी तसे प्रमाणपत्र सादर केले आहे त्या सर्व आजारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळले आहे . याखेरीज कर्मचाऱ्यांची वास्तववादी कारणे अथवा निकडीची गरज लक्षात घेता काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या कामातुन सुट देण्यात आली आहे असल्याचे श्री. डावखर यांनी सांगितले.