दिवसभरात २ हजार ९८२ रुग्णांचे निदान; ७ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मागील शनिवारी, १३ मार्च रोजी १३ हजार २४७ रुग्ण उपचाराधीन होते. मात्र, मागील आठवडाभरात दैनंदिन रुग्णांमध्ये सातत्याने वाढ झाल्यामुळे आठवडाभरात ८ हजार ८८ रुग्णांची वाढ झाली. मुंबईत सध्या २१ हजार ३३५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली, तर १३ ते १९ मार्चपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.६१ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ११४ दिवसांवर आला आहे.
मुंबईत शनिवारी पुन्हा २ हजार ९८२ रुग्णांचे निदान झाले असून, ७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ५८ हजार ८७९ झाली असून, बळींचा आकडा ११ हजार ५७२ झाला आहे. दिवसभरात १ हजार ७८० रुग्ण बरे झाले असून, ३ लाख २५ हजार ६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के झाला आहे. मुंबईतील झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन ३४ असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ३०२ इतकी आहे. मागील २४ तासांत पालिकेतर्फे रुग्णांच्या सहवासातील २० हजार ७२० अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.