वरळीत जमिनीच्या पोटात होणार २१६ कोटींचे बहुमजली वाहनतळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:22 AM2023-12-30T10:22:00+5:302023-12-30T10:23:59+5:30

पालिकेने मागविल्या निविदा, पार्किंगची कटकट मिटणार.

216 crores multi storey parking lot will be built in Worli mumbai | वरळीत जमिनीच्या पोटात होणार २१६ कोटींचे बहुमजली वाहनतळ

वरळीत जमिनीच्या पोटात होणार २१६ कोटींचे बहुमजली वाहनतळ

मुंबई : मुंबईतीलपार्किंगची समस्या सोडवण्यासाठी पालिकेतर्फे विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर वरळी येथे पालिकेच्या इंजिनीअरिंग हबजवळ पालिकेतर्फे भूमिगत बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी प्रशासनाकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. या बहुमजली स्वयंचलित वाहनतळासाठी २१६ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहनतळे अपुरी पडू लागली आहेत. मुंबईत वाहने पार्किंग कुठे करावीत, ही समस्या वाहनचालकांना भेडसावत आहे. पार्किंगसाठी जागा नसल्याने वाहनचालक मिळेल त्या जागेत वाहन पार्किंग करीत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देणे हे पालिकेपुढील मोठे आव्हान होते. काही वर्षांपूर्वी पालिकेने महालक्ष्मी येथील भुलाबाई देसाई रोड परिसरात स्वयंचलित बहुमजली वाहनतळ सुरू केले, मात्र ते आता कमी पडू लागल्यामुळे या भूमिगत वाहनतळांचा पर्याय पुढे आणला आहे. 

तब्बल एक हजार वाहनांना जागा मिळणार :
 
मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकानजीक तसेच मुंबादेवी परिसरात अशा दोन ठिकाणी बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ सुरू करण्याचे ठरवले होते. रोबो अर्थात स्वयंचलित पार्किंग उभारले जाणार आहे. 
यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. ही वाहनतळे पूर्ण झाल्यानंतर माटुंगा येथे ४७५ वाहनांसाठी तर मुंबादेवी येथे ५४६ वाहनांसाठी जागा उपलब्ध होऊ शकणार आहे. 
ही वाहनतळे जिथे पालिकेची मालकीची उद्याने, क्रीडांगणे, मोकळ्या जागेत, जमिनीखाली किंवा जमिनीवर तयार केली जाणार आहेत. 

आणखी तीन ठिकाणी होणार वाहनतळ?

पालिकेने आता अशा प्रकारची सुविधा आणखी तीन ठिकाणी उपलब्ध करण्याचे ठरवले आहे. वांद्रे पश्चिमेकडे पटवर्धन उद्यान, वरळी इंजिनीअरिंग हब आणि हुतात्मा चौकात वाहतूक बेटाजवळ वाहनतळ उभे केले जाणार आहे. त्यापैकी वरळी येथे वाहनतळ उभारण्यासाठी आराखडा तयार करणे, वाहनतळ उभारणे याकरता पालिकेने निविदा मागवल्या असून त्यासाठी सुमारे २१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

देखभालीसाठी २० वर्षांचे कंत्राट :

वाहनतळ उभारल्यानंतर त्याची देखभाल करणे आवश्यक आहे. वार्षिक देखभालीसाठी पालिका २० वर्षांसाठी कंत्राट देणार आहे. तर वाहनतळाचे प्रचालन, साफसफाई यासाठी पाच वर्षांचे कंत्राट दिले जाणार आहे. शटल व रोबो पार्किंगची सुविधा या वाहनतळामध्ये असेल.

Web Title: 216 crores multi storey parking lot will be built in Worli mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.