मुंबई : पाइपनिर्मिती करणाऱ्या मुंबईस्थित पीएसएल कंपनीने कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक आणि एक्झिम बँक या चार बँकांना २१७ कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी सीबीआयने गुरुवारी मुंबईत आठ ठिकाणी, तर दमण, कच्छ, नोएडा आणि दिल्ली येथे चार ठिकाणी छापेमारी केली. सीबीआयने कंपनीचा संचालक देवकी नंदन सेहगल याच्या अंधेरी येथील कार्यालयातून ९० हजार अमेरिकी डॉलर आणि एक कोटी ९९ लाखांची रोकड जप्त केली आहे.
सीबीआयने कंपनीचे संचालक अशोक पुंज, आलोक पुंज यांच्यासह आठ संचालकांविरोधात चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. कॅनरा बँकेकडून ३० कोटी ४९ लाख रूपये पीएसएलने उपकंपनीकडे वळविल्याचा आरोप आहे. पंजाब नॅशनल बँकेचे घेतलेले ५१ कोटी ९० लाख रूपये कर्ज गेल आणि एनटीपीसीच्या प्रकल्पांत गुंतवले. आयडीबीआय बँकेकडून २९ कोटी ६ लाखाचे कर्ज ज्या कारणासाठी देण्यात आले त्या ऐवजी ती रक्कम अन्य कर्जांची परतफेड करण्यासाठी वापरली. एक्झिम बँकेकडून कंपनीने १०५ कोटी ९२ लाखाची रक्कम अन्य कारणासाठी वापरली, असा आरोप कंपनीवर आहे.