आग्रीपाडामध्ये अनाथाश्रमात २२ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:07 AM2021-08-27T04:07:03+5:302021-08-27T04:07:03+5:30
मुंबई - कांदिवली (पश्चिम) येथील निवासी संकुलात १७ रहिवाशी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आता आग्रीपाडा येथील एका अनाथाश्रमात २२ जणांना ...
मुंबई - कांदिवली (पश्चिम) येथील निवासी संकुलात १७ रहिवाशी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आता आग्रीपाडा येथील एका अनाथाश्रमात २२ जणांना संसर्ग झाला आहे. यात १८ वर्षांखालील १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व बाधितांवर पालिका रुग्णालय आणि कोविड केंद्रात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र खबरदारीसाठी महापालिकेने हे अनाथाश्रमसील केले आहेत.
आग्रीपाडा येथील सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन कर्मचाऱ्यांचा कोविड चाचणी अहवाल २३ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे महापालिकेच्या ई विभाग कार्यालयामार्फत या अनाथाश्रमातील सर्वांची २४ ऑगस्ट रोजी कोविड आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यात विद्यार्थ्यांसह अनाथाश्रमातील कर्मचारी वर्ग, शिक्षक अशा सर्व ९५ जणांचा समावेश होता. यांपैकी २२ जण कोरोनाबाधित असल्याचे उजेडात आले आहे.
अनाथाश्रमातील २२ कोरोनाबाधितांपैकी चार विद्यार्थी १२ वर्षांखालील आहेत. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत; तर १२ ते १८ वयोगटातील १८ बाधित आढळून आले आहेत. या सर्वांना भायखळा येथील रिचर्ड्स अँड क्रूडास कोविड केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सात कर्मचाऱ्यांचाही समावेश असून, सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
अनाथाश्रम सील; पाच दिवसांनी पुन्हा चाचणी...
एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्याने महापालिकेने खबरदारीसाठी अनाथाश्रम सील केला आहे. नियमानुसार १४ दिवस या अनाथाश्रमात प्रवेश प्रतिबंधित असणार आहे. तसेेच पाच दिवसांनंतर पुन्हा सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी केली जाणार असल्याचे ई विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त मनीष वाळुंजे यांनी सांगितले.