मुंबई : आज शुक्रवार २१ डिसेंबर रोजी उत्तर रात्री ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे आज उत्तरायणारंभ होत आहे. आजपासून शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. आज दिनमान सर्वात लहान १० तास ५७ मिनिटांचे असून रात्र सर्वात मोठी म्हणजे १३ तास ३ मिनिटांची असेल. उद्यापासून दिनमान वाढत जाईल, असे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले.
सोमण म्हणाले, ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सूर्य ज्या दिवशी सायन मीन राशीत (१८ फेब्रुवारी ) प्रवेश करतो त्यावेळी वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. सायन वृषभ (२० एप्रिल ) ग्रीष्म ऋतू, सायन कर्क (२१ जून ) वर्षा ऋतू, सायन कन्या (२३ आगस्ट ) शरद ऋतू, सायन वृश्चिक (२३ आक्टोबर ) हेमंत ऋतू, सायन मकर (२१-२२ डिसेंबर ) शिशिर ऋतूचा प्रारंभ होतो. दर वर्षी २१ मार्च, २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे दिनमान व रात्रीमान समान असते. २१ जून रोजी दिनमान मोठे ( १३ तास १४ मिनिटे ) असून त्या दिवशी रात्र सर्वात लहान (१० तास ४६ मिनिटांची ) असते.