एनसीबीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मुंबईतील बिलार्ड पियार्ड येथील परदेशी टपाल कार्यालयात अमली पदार्थ असलेले पार्सल जप्त केले. पाच पाकिटांत एकूण २.२ किलो गांजा असून तो कॅनडातून पाठविण्यात आला होता. अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत दीड कोटी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या पाकिटावर ‘अत्यावश्यक अन्नपदार्थ’, असे स्टीकर लावण्यात आले होते.
एनसीबी मुंबईने मुंबईतील ड्रग्जविक्री व तस्करीच्या विरोधात मोहीम राबविली आहे. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी मंगळवारी परदेशी पोस्ट कार्यालयात जाऊन तपासणी केली. तेव्हा भांगेसाठी वापरल्या जाणाऱ्या २.२ किलो बड्स (कॅनाबीस) व गांजा जप्त केला. निळ्या रंगाच्या कॉटन बॉक्समध्ये ही पाकिटे लपविण्यात आली होती. हे अमली पदार्थ प्रति ग्रॅम ५ ते ८ हजार रुपयांना विकली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही पाकिटे कोणी मागविली, कोणाकडून पाठविण्यात आली, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.