लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर, उपनगरात शनिवारी मध्यरात्री बारा ते रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत कोसळलेल्या पावसात विविध ठिकाणी झालेल्या पडझडीच्या दुर्घटनांत एकूण २२ जणांना जीव गमवावा लागला आहे. ५ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर विविध रुग्णांलयात उपचार करण्यात आले. या दुर्घटनांतील मृतांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले असून, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची घोषणा केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत व जखमींवर मोफत उपचार केले जातील असे सांगितले.
शनिवारी मध्यरात्री एक वाजता चेंबूर येथील न्यू भारत नगर येथे संरक्षक भिंतीचा भाग घरांवर कोसळला. यामुळे चार ते पाच घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण जखमी झाले. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यापूर्वीच १५ जणांचा मृत्यू झाला. तर उर्वरित २ जखमींवर उपचार करत त्यांना सोडून देण्यात आले. येथील दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडूनदेखील येथे आवश्यक मदत रवाना करण्यात आली. सहा फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन यांच्यासह २० कामगार रविवारी दिवसभर येथे मदतकार्य करत होते. हे ठिकाण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित आहे.
विक्रोळी येथे शनिवारी मध्यरात्री २.४० वाजता सूर्यानगरमधील पंचशील चाळीतील सहा घरांवर दरडीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले. येथील जखमींना राजावाडी आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजावाडी येथे दाखल चार आणि महात्मा फुले रुग्णालयात दाखल एका जखमीचा मृत्यू झाला असून, महात्मा फुले रुग्णालयात दाखल जखमीस राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या जखमीची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त ठिकाणे वनविभागाच्या अखत्यारित आहेत. येथील दुर्घटनेची माहिती मिळताच मदतकार्य दिवसभर सुरू होते.
रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास चांदिवली येथे संघर्ष नगरमध्ये दरडीचा काही भाग इमारत क्रमांक १९ वर पडला. यात दोन लोक जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रविवारी पहाटे पाच वाजता भांडुप पश्चिम येथील कोंबडीगल्ली येथील अमरकुल विद्यालयाजवळ असलेल्या चाळीतील घराचा भाग कोसळून सोहम महादेव थोरात (१६) हा मुलगा जखमी झाला. मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
रविवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास अंधेरी येथील फिरदौस मिठाईवाला यांच्या दुकानात इलेक्ट्रिक शॉक लागल्यामुळे जखमी झालेले सलीम पटेल (२६) यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पहाटे सव्वाचार वाजता त्यांचा मृत्यू झाला.
नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले
मुंबईतल्या दुर्घटनांतील मृतांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. चेंबूर आणि विक्रोळी येथील दुर्घटनांत लोकांचा मृत्यू झाल्याने मी दु:खी आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. अशा दु:खद प्रसंगी माझ्या संवेदना शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत, असे म्हणत पंतप्रधानांनी मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची घोषणा केली आहे.
जखमींवर मोफत उपचार
चेंबूर व विक्रोळी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत व जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर
चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारतनगरमध्ये व विक्रोळी येथील दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ, अग्निशमन, महापालिका, पोलीस आदी यंत्रणांतर्फे तत्काळ बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले. अनेकांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. आपत्कालीन यंत्रणांकडून दुर्घटनास्थळीही तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.
यंत्रणेशी संपर्क साधा
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांनीही सुरक्षितताविषयक नियम व संदेशांचे पालन करून काळजी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलीस किंवा नजीकच्या शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री