मुंबई : कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी आणि कोरोनावर विजय मिळावा यासाठी सरकारला आर्थिक मदत केली जात आहे. मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २२ लाख रुपयाची मदत करण्यात आली आहे.
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे सरकारची आर्थिक बाजू मजबूत होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी दिला जात आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचे आवाहन केले आहे. त्यामुळे अनेक सेलेब्रिटी, कर्मचारी, सामान्य नागरिकांनी मदत केली. त्यामुळे राज्यावर ओढवलेल्या संकटात सामाजिक दायित्वातून एसटी कर्मचाऱ्यांकडून २२ लाखांची मदत केली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून ७ लाख आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या अधिपत्याखाली काम करत असलेल्या एसटी को. ऑपरेटिव्ह बॅंक संचालक मंडळाच्यावतीने १५ लाख असे एकूण २२ लाखाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे दिवस-रात्र मेहनत करुन कुठल्याही प्रकारचे राजकारण न आणता एकत्रितरित्या या महामारीच्या विरोधात लढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ही सामाजिक बांधीलकी जपणारी संघटना आहे. यापुर्वीही अशा संकटकालीन परिस्थितीत संघटना धावून गेली आहे, अशी माहिती मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.