खाते अपडेट करण्याच्या नादात २२ लाख गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:05 AM2021-01-23T04:05:42+5:302021-01-23T04:05:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ओटीपी क्रमांक शेअर केल्यामुळे एका कंपनीच्या बँक खात्यातून ११० वेळा झालेल्या व्यवहारात तब्बल २२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ओटीपी क्रमांक शेअर केल्यामुळे एका कंपनीच्या बँक खात्यातून ११० वेळा झालेल्या व्यवहारात तब्बल २२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांदिवली परिसरात राहणारे २८ वर्षीय तक्रारदार बोरिवलीच्या मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नोकरीला आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने कॉल करून कोटक महिंद्रा बँकेतून बोलत असल्याचे सांगून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नंबर दिल्याचे सांगितले. पुढे कंपनीचे बँक खाते अपडेट करायचे असल्याचे सांगत, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओ. टी. पी. देण्यास सांगितला. त्याच्यावर विश्वास ठेवून तक्रारदार यांनी ओटीपी क्रमांक शेअर केला. अशात १५ मिनिटात खाते अपडेट होणार असल्याचे सांगत फोन कट केला. त्यानंतर कंपनीत आलेल्या ग्राहकाचे पैसे आले की नाही, याची पाहणी करत असताना, २० हजार रुपयांचे ४ व्यवहार झाल्याचे समजले. पुढे त्यांना संशय आल्याने त्यांनी सिस्टीम चालू करत खाते तपासले असता, २० हजार रुपयांचे ११० व्यवहार झाल्याची माहिती समोर आल्याने त्यांना धक्का बसला. यात एकूण २२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलीस अधिक तपास करत आहेत.