Join us

चुकीच्या उपचारांमुळे २२ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, जे. जे. रुग्णालयातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 4:43 AM

निष्काळजी आणि चुकीच्या उपचारांमुळे सर जे. जे. रुग्णालयात एका २२ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळाचे वडील वसीम शेख यांनी जे.जे. रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

मुंबई - निष्काळजी आणि चुकीच्या उपचारांमुळे सर जे. जे. रुग्णालयात एका २२ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाळाचे वडील वसीम शेख यांनी जे.जे. रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.श्वानदंश झालेला नसताना रेबिजची लक्षणे या निव्वळ अंदाजावर उपचार केल्याचा दावा शेख कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी ठोस कारवाई किंवा चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, तसेच जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनीच आपल्या मुलाची हत्या केली, असा आरोप वाळीव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे वसीम शेख यांनी केला आहे. जे. जे. पोलीस स्टेशनमध्येच तक्रार दिली आहे, पण हेल्थ कमिटीही जे. जे. रुग्णालयाचीच असल्याकारणाने लागणारा निर्णयही रुग्णालयाच्या बाजूनेच लागणार. तरीही आम्ही न्याय होईल, याची अपेक्षा करतो, असे वसीम शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.२६ मार्चच्या रात्री अजान वसीम शेख हा २२ महिन्यांचा मुलगा झोपेतून दचकून झाला आणि घाबरल्यासारखा करू लागला. त्यामुळे आधी त्याला वसीम वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन गेले. तेव्हा लीलावतीतील डॉक्टरांनीत्याला रेबिजची प्राथमिक लक्षणे असल्याचे सांगितले. त्यामुळेपुढील उपचारांसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्याचासल्ला दिला. तेथील डॉक्टरांनीजे. जे.मध्ये दाखल करा, असे सांगितले. जे. जे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू केले.शेख यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, २८ मार्चला संध्याकाळी एक महिला शिकाऊ डॉक्टर अजानच्या थुंकीचा नमुना घेत असताना, व्हेंटिलेटरवरील अजानच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. अजानच्या घशात टाकलेल्या नळीला काढत असताना, त्याच्या घशाला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाल्याचा आरोप वसीम शेख यांनी केला आहे. रक्तस्त्राव का होतोय, हे विचारले असता, तिथल्या डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या दरम्यान अजानच्या प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तत्काळ रक्ताची जुळवाजुळव केली.महिला डॉक्टरने, ‘अजान पुढचे जेमतेम दोन दिवस जगू शकेल, त्याची प्रकृती नाजूक आहे,’ असेदेखील सांगितले. २९ मार्चला त्याचे एक्स-रे करायचे आहेत, असे सांगण्यात आले, पण कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांनी एक्स-रे करता येणार नाहीत, असे सांगितले.३० मार्चला मणक्यातील पाण्याचे आणि अन्य नमुने, आवश्यक ती कागदपत्रे हाती देत, जे. जे.तील डॉक्टरांनी याची चाचणी बंगळुरू येथील निम्हंस रुग्णालयात करावी लागेल, असे सांगितले. तेथील चाचणीत अजानला रेबिज नसल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला.रविवारी मध्यरात्री १ ते पहाटे ४ या वेळेत वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने अजानचा व्हेंटिलेटर सहा ते सात वेळा बाजूला करून, नैसर्गिकरीत्या उपचार करण्याचे प्रयत्न केले, पण अखेर ४च्या सुमारास त्यांनी अजानचा मृत्यू ओढावल्याचे वसीम शेख यांना कळविले, असेही सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :मृत्यूहॉस्पिटल