मुंबई : मध्य रेल्वेच्या येत्या नवीन वेळापत्रकात ठाणे-वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर २२ जादा फेऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळे प्रवासी क्षमता ६६ हजारांनी वाढणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. ट्रान्स हार्बरला दिलासा देतानाच या वर्षात हार्बरवरील बारा डबा लोकलचा प्रकल्पही पूर्ण होणार असल्याने, या मार्गावरील प्रवासी क्षमताही वाढू शकेल, अशी माहितीही देण्यात आली. सध्या हार्बर मार्गावर बारा डबा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. वडाळा आणि सीएसटी स्थानकात यासाठी महत्त्वाचे काम केले जाणार असून, अन्य स्थानकातील कामे मार्गी लावण्यात आली आहेत. हार्बर मार्गावर नऊ डबा लोकल धावत असून, बारा डबा लोकल धावल्यास प्रवासी क्षमताही चांगलीच वाढेल, असा दावा मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. नऊ डबा लोकलचे बारा डबा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डब्यांची आवश्यकता असल्याचेही अधिकारी सांगतात. त्याची जुळवाजुळव केल्यावरच जास्तीत जास्त बारा डबा चालविणे शक्य होईल. तोपर्यंत मध्य रेल्वेकडून ट्रान्स हार्बर प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. यंदाच्या नवीन वेळापत्रकात ट्रान्स हार्बरसाठी २२ फेऱ्यांचा समावेश करण्यात येणार असल्याने, प्रवासी क्षमता ६६ हजारांनी वाढणार आहे. सध्या या मार्गावर १0 लोकलच्या २१0 फेऱ्या होतात. लोकलची संख्या न वाढवताच तेवढ्याच लोकलमध्ये फेऱ्यांची वाढ करण्याचा प्रयत्न असणार आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, वाढीव फेऱ्यांमुळे ट्रान्स हार्बरवरील प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी होईल. (प्रतिनिधी)
२२ फेऱ्यांमुळे प्रवासी क्षमतेत वाढ
By admin | Published: January 04, 2016 2:14 AM