सरळगांव : मुरबाड तालुक्यातील पद्याचीवाडी शिरगाव या आदिवासी वाडीतील विहीरीच्या पाण्याची बाधा होवून २२ अत्यवस्थ झाले. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.तालुक्यात भिषण पाणीटंचाई असतानाही पद्याचीवाडी (शिरगाव ) या आदिवासी वाडीतील विहीरीची डागडूजी गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नाही. तिची साफसफाई सुद्धा करण्यात आली नाही. या विहीरीत कधीही ग्रामपंचायतीकडूनही जल शुद्धीकरणासाठी टिसीएलचा वापर केला नाही. त्यामुळे कठडे तुटलेल्या या विहीरीत शेजारून जाणाऱ्या नाल्यातील पाणी जात आहे. गावात पाणीपुरवठा योजनेचे पाणी नसल्याने ग्रामस्थांना उन्हाळ्यात नदीकाठच्या डवऱ्यांतील व पावसाळ्यात याच विहीरीचे पाणी प्यावे लागत आहे. हेच पाणी प्यायल्याने २२ लोकांना पोटात मळमळायला लागून पोटात दुखून उलट्या होवू लागल्या. अत्यवस्थ झालेल्या लोकांना रूग्णवाहिकेतून मुरबाड येथिल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. यापैकी धर्मा झुगरे, सखुबाई निरगुडा, गोपाळ झुगरे, सखुबाई गिरा, परसू झुगरे, कमल झुगरे, भिमा झुगरे, आवडू झुगरे, सुगंधा झुगरे, कल्पना झुगरे या दहा लोकांची प्रकृती गंभीर आाहे. त्यांच्यावर ग्रामीण रूग्णालय मुरबाडमध्ये उपचार सुरू आहेत. अन्य बारा लोकांना उपचार करून घरी पाठविण्यात आले.
विहिरीच्या पाण्यातून २२ आदिवासींना झाली बाधा
By admin | Published: June 30, 2015 3:04 AM