गणेशोत्सवासाठी एसटीच्या २२०० जादा बसेस, २७ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 05:24 AM2019-07-20T05:24:41+5:302019-07-20T05:24:49+5:30

यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २२०० जादा बसेसची सोय केली आहे.

2200 additional buses of ST for Ganeshotsav, reservation starts from 27th July | गणेशोत्सवासाठी एसटीच्या २२०० जादा बसेस, २७ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात

गणेशोत्सवासाठी एसटीच्या २२०० जादा बसेस, २७ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात

Next

मुंबई : यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २२०० जादा बसेसची सोय केली आहे. लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने २२०० बसेस मुंबईच्या गणेशोत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. २८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार असून, येत्या २७ जुलै (एक महिना अगोदर)पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या वर्षापासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचेदेखील आरक्षण एकाच वेळी म्हणजे २७ जुलैपासून करता येणार आहे.
२८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील १४ बस स्थानके व बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बस स्थानकांवरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.
>ग्रुप आरक्षण
२० जुलैपासून
गणपती उत्सवासाठी मुंबईतल्या विविध उपनगरांतील लोक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा सलग असणाºया गावात जाण्यासाठी एसटीची बस आरक्षित करतात. ती त्यांना सोयीची ठरते. गेली कित्येक वर्षे एसटी या चाकरमान्यांना त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते कोकणातील त्यांच्या वाडी-वस्ती व गावापर्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणे नेऊन सोडत आली आहे. अशा गट आरक्षणाला (ग्रुप बुकिंगला) २० जुलैपासून सुरुवात होत आहे. संबंधितांनी ग्रुप बुकिंगसाठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

Web Title: 2200 additional buses of ST for Ganeshotsav, reservation starts from 27th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.