मुंबई : मुंबई मॅरेथॉनदरम्यान कामगारांनीच सोन्याचे मेडल समजून स्पर्धकांसाठी असलेली २,२०० पदके पळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रात्री उशिराने आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदवत सहा जणांना अटक केली. आरोपींकडून ६२० मेडल जप्त करण्यात यश आली आहेत.
या कारवाईत विघ्नेश पांडे तेवर (२०), नासिर शेख (२४), पिरमल बालन गौंडर, गौतम सोळुंके (२४), रोहित विजयसिंह (२३) आणि आमिर शेख (२६) यांना अटक केली. यापैकी विघ्नेश, नासिरसह तिघे जण कामगार असून, तीन जण त्यांचे मित्र आहेत. तक्रारीनुसार, मॅरेथॉन स्पर्धेसाठी बॉम्बे जिमखाना येथील मैदानात बांधलेल्या टेंटमध्ये स्पर्धकांना देण्यासाठी ठेवलेल्या मेडलच्या एकूण १६२ बॉक्सपैकी मेडलचे एकूण २२ बॉक्समधील २,२०० मेडल गायब असल्याने खळबळ उडाली.
याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली. चौकशीत आरोपीनीच मेडल चोरल्याचे समोर आले. त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत सव्वा लाख किमतीचे ६२० मेडल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश माने, पीएसआय अरुण गायकवाड, कमल करचे यांच्यासह तपास पथकाने ही कारवाई केली.
भंगाराच्या आडून नेले बॉक्स
या सहा जणांपैकी काही जण भंगार घेऊन जात असताना त्यांच्याकडील पिशवी पाहून बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसाला संशय आला. त्यांनी चौकशी करताच प्लास्टिकच्या बॉटलखाली त्यांना बॉक्स मिळून आले. त्यामध्ये मेडल होते. अखेर, याबाबत आयोजकांना समजताच त्यांनी आतमध्ये तपासणी केली तेव्हा एकूण २२ बॉक्स गायब असल्याचे समोर आले होते. त्यानुसार, पोलिसांनी पुढे तपास करत आरोपींच्या झोपडीबाहेरून काही बॉक्स जप्त केले. त्यानुसार, पोलिस अधिक चौकशी करत आहेत.