मुंबईतील २२ हजार महिलांना 'लाडकी बहिण' योजनेतून वगळले, पडताळणी वेगात सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 14:52 IST2025-02-06T14:51:47+5:302025-02-06T14:52:26+5:30
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी याआधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील २२ हजार महिलांना 'लाडकी बहिण' योजनेतून वगळले, पडताळणी वेगात सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी याआधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी सरकारकडून परिवहन आणि आयकर विभागाची मदत घेतली जात आहे. यात छाननी प्रक्रियेत मुंबईतील २२ हजार महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला दिली.
शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अधिक आहे, अशा महिला योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. तर बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे गैरप्रकारही उघडकीस आलेत. इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड, बँक पासबूक आणि इतर कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया महसूल विभागाने सुरू केली आहे. फेब्रुवारीअखेर त्याची पडताळणी होऊन महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल. नवीन अर्जांचीही आता काटेकोरपणे पडताळणी केली जात आहे.
कोण होणार अपात्र?
- अडीच लाख रुपयांहून जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला
- स्वत:च्या नावे चारचाकी वाहनं असणारे
- शासकीय सेवेत असणाऱ्या महिला
- लग्नानंतर परराज्यात गेलेल्या महिला
- इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला
- बँक खातं आणि आधार कार्डवर वेगवेगळे नाव असणाऱ्या महिला
लाभ सोडण्यासाठी कुठे कराल अर्ज?
- शासनाकडून दिला जाणारा लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल.
- शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे याचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल
मुंबईमध्ये अधिकृत आकडेवारीनुसार संजय गांधी निराधार योजनेचा २७२४ महिला, तर ११२७ महिला श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत.