Join us

२२३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प बीएमसीच्या स्थायी समितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2021 10:04 AM

BMC : बेस्टच्या अर्थसंकल्पावर सोमवारी एक तास ४० मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट व काँग्रेस सदस्य जावेद जुनेजा अशा फक्त पाच नगरसेवकांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या.

मुंबई :  बेस्ट उपक्रमाचा २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा दोन हजार २३६ कोटी तुटीचा अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेनेने मंजूर केला. हा अर्थसंकल्प बेकायदेशीर आणि फसवा असल्याने फेरविचारार्थ पाठविण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र, हा विरोध डावलून अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. आता यावर अंतिम निर्णय पालिका महासभेत घेण्यात येणार आहे. बेस्टच्या अर्थसंकल्पावर सोमवारी एक तास ४० मिनिटे चर्चा झाली. विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, भाजपचे सदस्य भालचंद्र शिरसाट व काँग्रेस सदस्य जावेद जुनेजा अशा फक्त पाच नगरसेवकांनी आपल्या सूचना यावेळी मांडल्या. या अर्थसंकल्पात, बेस्टचा वीज विभाग १२६.०१ कोटी रुपये, तर परिवहन विभाग २११०.४७ कोटी रुपये तुटीत असल्याचे दर्शविण्यात आले आहे.बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते, सदस्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर, अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, मतदान घेत अर्थसंकल्प बहुमताने मंजूर केला. हा अर्थसंकल्प आता पालिका सभागृहात मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. 

अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला होता. त्याची  अंमल बजावणी करण्यात यावी, अशी मागणी भाजप व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यावेळी केली. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी, बेस्टचा अर्थसंकल्प फसवा असल्याची टीका केली.

टॅग्स :बेस्टमुंबई महानगरपालिका