मुंबई : आरे कॉलनीतील २२३८ झाड तोडण्यास शिवसेनेचा विरोध असल्याने मेट्रो कारशेडचा प्रस्ताव गेली दोन वर्षे रखडला होता. पहारेकºयांनी बहुमताच्या जोरावर आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या मार्गातील अडसर अखेर दूर केला आहे. महापालिकेत सत्तेवर असूनही भाजपच्या खेळीमुळे शिवसेना एकटी पडली. झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यामुळे मेट्रो कारशेडचे काम आता सुसाट होणार आहे. या विरोधात शिवसेनेने आता न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.
गोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीत मेट्रो ३ प्रकल्पासाठी कारशेड बांधण्यात येणार आहे. आरे कॉलनीतील २२३८ झाडे यामुळे बाधित होणार आहेत. ही झाडे तोडण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती वृक्ष प्राधिकरणाकडे करण्यात आली होती. पर्यावरणप्रेमी संस्था, मनसे आणि शिवसेनेनेही विरोध दर्शविला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने वृक्ष प्राधिकरणामध्ये तज्ज्ञांची नियुक्ती होईपर्यंत कोणताही प्रस्ताव मंजूर करू नये, असे आदेश दिले होते. मेट्रो कारशेडचे काम लांबणीवर पडले होते. तज्ज्ञांच्या नियुक्तीनंतर हा प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा प्राधिकरणासमोर मंजुरीसाठी आणला होता.
शिवसेनेबरोबरच विरोधी पक्षांनीही आक्षेप घेतल्यामुळे भाजपचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अडचणीत सापडला होता. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत या प्रस्तावावर गुरुवारी मतदान करताना विरोधकांनी भाजपला साथ दिली. झाडे तोडण्याच्या बाजूने आठ तर विरोधात सहा मते पडल्यामुळे हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. मेट्रो कंपनीला मदत करण्याचा भाजपचा डाव असून तीन तज्ज्ञांनी झाडे तोडण्याच्या बाजूने केलेले मतदान ‘अर्थ’पूर्ण व संशयास्पद असल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकार परिषदेतून केला. झाडे तोडण्याच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले....अशी पडली मतेवृक्ष प्राधिकरणमध्ये शिवसेनेचे सहा, भाजप चार, काँग्रेस दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि विशेष तज्ज्ञ पाच असे सदस्य आहेत. झाडे तोडण्याच्या बाजूने आठ तर तोडू नयेत यासाठी सहा मते पडली. भाजपला तीन तज्ज्ञ, एक राष्ट्रवादी अशा चार सदस्यांची साथ मिळाली. तर काँग्रेस पक्षाने सभात्याग केला. त्यामुळे शिवसेना एकटी पडली.२०२१ पर्यंत मुंबईकरांना मेट्रोची भेट देण्याचे लक्ष्य आहे. असे विकासाचे प्रकल्प मुंबईसाठी आवश्यक आहेत. तोडलेली झाडे पुनर्राेपित केली का? याची खात्री करणे आपली जबाबदारी आहे. विकासाच्या अजेंड्याला जशी केंद्रात साथ मिळत आहे तशी महापालिकेतही मिळेल.- मनोज कोटक(भाजप गटनेते, खासदार)मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा पर्याय असताना आरे कॉलनीतील झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. विकासाच्या नावाखाली खाजगी कंपनीला भाजप मदत करीत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नियुक्त करण्यात आलेले विशेष तज्ज्ञ झाडे तोडण्यास पाठिंबा देतात. त्यांचाही काही आर्थिक संबंध असल्याचे यातून दिसून येते. २७ आदिवासी पाड्यांचे नुकसान होणार आहे. पर्यावरण नष्ट करण्यासाठी सुरू असलेला हा प्रयत्न हाणून पाडू. त्यासाठी न्यायालयात दाद मागणार आहोत.- यशवंत जाधव (स्थायी समिती, अध्यक्ष)झाडे तोडण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम; न्यायालयामध्ये दाखल करणार याचिकामेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड बांधण्यासाठी २ हजार २३८ झाडे बाधित ठरत होती, ही झाडे कापण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये आला होता. या प्रस्तावास गुरुवारी मंजुरी देण्यात आली, मात्र आरेमधील झाडे तोडण्यास पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे सेव्ह ट्री संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.वृक्ष प्राधिकरणाने झाडे तोडण्यास मंजुरी दिल्याने पर्यावरणवादी संघटनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केला आहे. ही झाडे तोडू नयेत म्हणून आम्ही पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर सर्व मुद्दे ठेवले होते. त्यांनी या प्रस्तावास कशी काय मंजुरी दिली, हे अजून आम्हाला समजलेले नाही. हा निर्णय चुकीचा आहे, असे मत ‘सेव्ह ट्री’चे सदस्य झोरू बाथेना यांनी व्यक्त केले. तसेच या निर्णयाविरोधात १५ दिवसांत न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याचे बाथेना यांनी सांगितले़