लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईतील पालिका आणि खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे २२५ रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू ओढावला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर सहा ते आठ आठवडे रुग्णांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हा आजार बुरशीजन्य असला, तरी संसर्गजन्य असल्याचे आढळून आले नसल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले.
या आजाराबद्दल कोविड रुग्णालयांमधील डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. आजारावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा गट तयार केला आहे. आजार होऊ नये यासाठीची काळजी, झाल्यास उपचारपद्धती, उपकरणे, औषधे याबाबत प्रोटोकॉल निश्चित केलेला आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांना याचा धोका अधिक आहे. त्याचप्रमाणे कोरोना उपचारादरम्यान गरज नसताना दिलेल्या स्टेरॉइडमुळे हा आजार होत आहे. मधुमेह रुग्ण असेल तर उपचारादरम्यान त्याची शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे कोरोना उपचारानंतर मधुमेहावर नियंत्रण ठेवले पाहिजे. गरज नसेल तर करोना उपचारात स्टेरॉइडचा वापर करू नये, अशी माहिती डॉ. सागर जैन यांनी दिली आहे.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
वातावरणात असलेल्या जिवाणू, विषाणू आणि बुरशी (फंगस) या सूक्ष्म जंतूंमुळे माणसाला विविध आजार होतात. ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे आणि तो कोरोनाची लाट येण्यापूर्वीपासूनच आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर वाढणे आणि अतिमात्रेची स्टेरॉइड दीर्घकाळ घेणे, या तीन महत्त्वाच्या कारणांमुळे ‘म्युकर’ या बुरशीचा संसर्ग होऊन, म्युकरमायकोसिस होतो. कॅन्सरग्रस्त, मूत्रपिंड किंवा इतर अवयवांचे प्रत्यारोपण झालेल्या, तसेच डायलिसिसवर असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने, हा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.
म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण - २२५
मृत्यू - २१
ही घ्या काळजी
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी, ती वाढणार नाही याची काळजी घ्यावी. रुग्णावर स्टेरॉइडचा वापर योग्य प्रमाणातच करावा. तोंड, नाक, दातांसह शरीराची नियमित स्वच्छता ठेवावी. कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करताना कटाक्षाने डिस्टिल्ड वॉटरचाच वापर करावा. नियमित योगा, व्यायाम, चौरस आहाराने रोगप्रतिकारशक्ती वाढवावी. पुरेशी विश्रांती घ्यावी.
प्राथमिक लक्षणे
नाकातील खपलीने या आजाराची सुरुवात होते. खपली होताच तज्ज्ञांकडून वेळेत तपासून घेतले तर आजाराला तेथेच अटकाव करता येतो. कोविडमुळे शरीराच्या ज्या पेशी मरतात, त्यातून लोह तत्त्व (आयर्न) बाहेर पडते. हे या आजारातील बुरशीचे प्रमुख खाद्य असते. डोळे, नाकाभोवती तसेच चेहऱ्यावर सूज, नाकातून रक्त येणे, गाल व टाळूला बधिरता येणे, दात खिळखिळे होणे, डोके दुखणे ही काही प्रमुख लक्षणे आहेत.
औषध खरेदीची प्रक्रिया सुरू
कोविड उपचार पद्धतीत स्टेरॉइड आणि टॉसिलीझुमॅबचा अतिवापर टाळावा, विशेषतः मधुमेही रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. म्युकरमायकोसिस या आजारावर वापरण्यात येणारी ‘एम्फोटेरेसीन बी’ हे इंजेक्शन व अन्य औषधांची खरेदी करण्यासाठी पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणामार्फत प्रक्रिया सुरू केली आहे. रुग्णालय व्यवस्थापनांना स्थानिक स्तरावर औषध खरेदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांना ८ ते १२ आठवडे निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उपचार शक्य
एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शन्सची मागणी प्रचंड वाढल्याने ते उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर्स, अद्ययावत उपचार सुविधांची कमतरता आहे; परंतु सध्या तरी शहरात या सेवा-सुविधा चांगल्यापैकी उपलब्ध आहेत.
- डॉ. नवीन कटारिया, कान-नाक-घसातज्ज्ञ
वेळीच उपचार केले नाही तर गंभीर अवस्था
वेळीच निदान होऊन उपचार सुरू केले नाहीत तर हा आजार रुग्णाला मृत्यूपर्यंत घेऊन जातो. नाक, घसा, डोळे आणि शेवटी मेंदू असा म्युकरमायकोसिसचा प्रवास होतो. हे सर्व भाग अत्यंत नाजूक आहेत. त्यामुळे गरज पडल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. या शस्त्रक्रिया खर्चिक व गुंतागुंतीच्या असतात. शस्त्रक्रिया किमान दोन तास चालते. बुरशी ज्या अवयवापर्यंत पोहोचते तो भाग काढून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. अनेकांनी या आजारामुळे डोळेदेखील गमावले आहेत.
- डॉ. हेतल जैन, कान-नाक-घसातज्ज्ञ