मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पंतप्रधान निधीला 2.27 कोटी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:18 PM2020-04-05T18:18:36+5:302020-04-05T18:19:08+5:30
कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पंतप्रधान निधीला पीएम केअर फंड मध्ये दोन कोटी सत्तावीस लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पंतप्रधान निधीला पीएम केअर फंड मध्ये दोन कोटी सत्तावीस लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. मुबई पोर्ट ट्रस्ट ने सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) मधून एक कोटी रुपये दिले आहेत. तर सध्या कार्यरत असलेल्या 6324 कर्मचारी व अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन एकत्र करुन एक कोटी सत्तावीस लाख रुपये देण्यात आले.
कोरोनाच्या संकटाने सध्या जगात तसेच महाराष्ट्रात व संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अखिल भारतीय बंदर व गोदी कामगारांचे ज्येष्ठ नेते एस. के. शेट्ये, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त केरशी पारेख व इतर कामगार संघटनांच्या सहकार्याने कामगारांचा एक दिवसाचा पगार देण्यास संमती दिल्यामुळे कामगारांचे 1.27 कोटी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे 1 कोटी मिळून मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया यांनी 2. 27 कोटी रुपये मदत पंतप्रधान निधीला केली आहे. केंद्रीय नौकावहन मंत्री मनसुख मांडविया यांच्या आवाहनानुसार मुंबई बंदरातील कामगारांनी एक दिवसाचा पगार पंतप्रधान मदत निधी साठी दिला आहे.
पोर्ट ट्रस्ट ट्रस्टचे मुख्य वैद्यकीय अधिकारी अण्णा दुराई, सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून पोर्ट ट्रस्ट रुग्णालयामध्ये रुग्णांची सेवा करत आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टने कोविड 19 चा सामना करण्यासाठी आपले रुग्णालय सज्ज ठेवले आहे. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव यांनी केले आहे.