मुंबई : महानगरपालिका क्षेत्रामध्ये हाती घेतलेल्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचा एक भाग म्हणून मुंबईकर नागरिकांच्या सहभागाने महापालिकेच्या २२७ निवडणूक प्रभागांत एकाचवेळी श्रमदानातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.वडाळा येथील दोस्ती एकर्समध्ये सभागृह नेता तृष्णा विश्वासराव यांनी श्रमदान केले, तर अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास खारगे यांनी माहीम येथे हिंदुजा रुग्णालयाच्या व्यवस्थापन आणि कर्मचारीवृंदासमवेत श्रमदान करून जनतेला प्रोत्साहन दिले.स्वच्छ भारत, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाअंतर्गत प्रत्येक नागरिकाने आठवड्यातून २ तास व वर्षातून १०० तास श्रमदानातून स्वच्छता करणे अपेक्षित आहे. यास्तव नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेत त्याची व्यापकता प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचावी यासाठी महापालिकेने सार्वत्रिक श्रमदानाचा उपक्रम सुरू केला आहे. महापालिकेचे सभागृह नेता तृष्णा विश्वासराव यांनी वडाळा येथील दोस्ती एकर्समध्ये सुमारे १५० नागरिकांसमवेत श्रमदान केले. या वेळी एफ/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे, घनकचरा व्यवस्थापन खात्याचे विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी हेही उपस्थित होते. शिवाय येथे गुरू तेगबहादूरसिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश देणारी पदयात्रा काढली होती. जी/उत्तर विभागात अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे यांनी प्रारंभी चैत्यभूमी, दादर चौपाटी आणि दादर हिंदू स्मशानभूमी येथे भेट देऊन स्वच्छतेचा आढावा घेतला व योग्य त्या सूचना केल्या. यानंतर हिंदुजा रुग्णालयाचे व्यवस्थापन, वैद्यकीय मंडळी आणि कर्मचारी तसेच नागरिक अशा सुमारे १०० जणांच्या समूहाने हिंदुजा रुग्णालयाजवळील समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली.माटुंगा लेबर कॅम्प येथे स्थानिक शंभरावर नागरिकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. धारावी पम्पिंग स्टेशनजवळील कचरा वर्गीकरण केंद्राला या वेळी खारगे यांनी भेट देऊन पाहणी केली. मुंबईभर ठिकठिकाणी नागरिक आणि सामाजिक संस्था, बिगर शासकीय संस्था यांच्या समवेत आयोजित या सार्वत्रिक श्रमदानाप्रसंगी संबंधित परिमंडळांचे उपआयुक्त, सहायक आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
२२७ प्रभागांत श्रमदान!
By admin | Published: November 03, 2014 1:25 AM