Join us

तळीरामांनी रिचवली २३.५८ कोटी लिटर विदेशी दारू, वाइन विक्री वाढली ; बीयर प्रेमींत किंचित घट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 6:26 AM

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा जोर सुरू असताना २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यातील तळीरामांनी तब्बल २३.५८ कोटी लिटर विदेशी दारू रिचवल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई :  

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा जोर सुरू असताना २०२१-२२ या आर्थिक वर्षात राज्यातील तळीरामांनी तब्बल २३.५८ कोटी लिटर विदेशी दारू रिचवल्याची माहिती समोर आली आहे. इतर मद्द्यांच्या तुलनेत देशी दारू पिणाऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक असून, बीअरप्रेमींत किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दहा वर्षांत वाइन विक्रीत मात्र वाढ झाली आहे.मद्यविक्रीपेक्षा वसुलीतून अधिक महसूलमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दहा वर्षांत प्रत्यक्ष मद्यविक्रीतून मिळणाऱ्या महसुलापेक्षा विविध कारवाया आणि करवसुलीतून मिळणारे उत्पन्न अधिक आहे. म्हणजे २०१२-१३ या आर्थिक वर्षात ८०.५५ कोटी लिटर मद्यविक्री झाली, तर ९ हजार २९७ कोटी रुपये महसूल शासकीय तिजोरीत जमा झाला होता. त्यातुलनेत २०२१-२२ मध्ये केवळ ८२.४ कोटी लिटर दारू विकली गेली आणि १७ हजार १७७ कोटी रुपये महसूल मिळाला. विविध प्रकारचे परवाने, मद्यावरील कर, मद्य तस्करी तसेच बनावट मद्यावरील कारवाईतून हा अतिरिक्त महसूल जमा झाला आहे.

तक्रार कुठे कराल? अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रारी स्वीकारण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने २४ तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यावर तक्रार करणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाते. ०२२-२२६६०१५२, ८४२२००११३३ (व्हॉट्सॲप) या क्रमांकावर तक्रार करा.

३४,८४९ जणांना ठोकल्या बेड्या२०२१-२२ या आर्थिक वर्षात मद्य तस्करी, बनावट मद्याचे उत्पादन, विनापरवाना विक्रीसह अन्य प्रकरणांत तब्बल ३४ हजार ८४९ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. आजवरची ही सर्वाधिक कारवाई आहे. गेल्या वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे ४८,७५० गुन्हे नोंद झाले, तर ३४,५४९ वारस गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यात हातभट्टी निर्मिती, विक्री आणि वाहतुकीचे २५,५०० गुन्हे, परराज्यातील अवैध मद्यासंबंधी १२०९, तर अवैध ढाब्यांवरील ४४८७ गुन्ह्यांचा समावेश आहे. या माध्यमातून १४४ कोटी ४४ लाखांची विक्रमी वसुली करण्यात आली. परराज्यातून मद्यतस्करी करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईतून सर्वाधिक ५७ कोटींची रक्कम जमा झाली. 

 

टॅग्स :दारूबंदी