लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : २०२१ मध्ये २५ सुट्ट्यांपैकी २५ एप्रिल श्री महावीर जयंती आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दोनच सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. यामुळे इतर दिनी चाकरमान्यांना २३ सुट्ट्यांची चंगळ अनुभवता येणार आहे. एप्रिलमध्ये आलेल्या ५ पैकी १३ एप्रिल गुढीपाडवा आणि १४ एप्रिल डॉ. आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्या जोडून आल्या आहेत, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. मार्च, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यांत भरपूर विवाह मुहूर्त आहेत. गणेशभक्तांसाठी २ मार्च, २७ जुलै आणि २३ नोव्हेंबर अशा तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेल्या आहेत. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग आले आहेत. २०२१ हे नूतन वर्ष लीपवर्ष नसल्याने या वर्षात कामे करायला फक्त ३६५ दिवसच मिळणार आहेत. तसेच सरत्या २०२० वर्षात ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाणार नसल्याने नूतन वर्षारंभ रात्री ठीक १२ वाजताच होणार आहे. मात्र, पृथ्वीच्या गतीत होणाऱ्या बदलामुळे २०२१ मध्ये ३० जूनला रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाण्याची शक्यता असल्याचेही सोमण यांनी सांगितले.