Join us

२३ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी बोरीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 6:22 AM

राज्य शासनाने मंगळवारी २३ आयएएस तर तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कॅडरच्या अधिकाऱ्यांची बदली केली.

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी २३ आयएएस तर तीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कॅडरच्या अधिकाऱ्यांची बदली केली. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजीराव दौंड हे कोकण विभागाचे नवे महसूल आयुक्त असतील. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद बोरीकर यांची बदली करण्यात आली. आतापर्यंत या ठिकाणी जिल्हाधिकारी असलेले सचिन कुर्वे हे मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव असतील.ए.बी. मिसाळ यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. कामगार आयुक्त आर.आर. जाधव यांची बदली आयुक्त मत्स्यव्यवसाय या पदावर करण्यात आली आहे. आतापर्यंत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. रामस्वामी एन. हे नवे कामगार आयुक्त असतील. म्हाडा, मुंबईचे मुख्याधिकारी डी.एस. कुशवाह यांची बदली महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डच्या सीईओपदी करण्यात आली. अजित पाटील हे महाराष्ट्र माहिती-तंत्रज्ञान महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. आतापर्यंत या पदावर असलेले राधाकृष्णन बी. हे म्हाडा, मुंबईचे नवे मुख्याधिकारी असतील.पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची बदली सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी तर नंदुरबारचे जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची बदली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था; पुणेचे आयुक्त म्हणून करण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र भारूड हे नंदुरबारचे नवे जिल्हाधिकारी असतील. सातारा जिल्हा परिषदेचे सीईओ कैलाश शिंदे हे पालघरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून जात आहेत.नाशिक जिल्हा परिषदेचे सीईओ नरेश गीते हे भंडाराचे नवे जिल्हाधिकारी असतील. त्यांच्या जागी आदिवासी विकास विभागात सहजिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी असलेल्या भुवनेश्वरी एस. नाशिक जि.प.च्या नव्या सीईओ असतील. धुळेचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे महावितरण; औरंगाबादचे नवे सहव्यवस्थापकीय संचालक असतील. धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ गंगाधरन डी. हे धुळ्याचे नवे जिल्हाधिकारी असतील. भंडारा येथे आतापर्यंत जिल्हाधिकारी असलेले शंतनू गोयल हे पुणे महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त असतील. अमरावती येथील अतिरिक्त आदिवासी आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रन नाशिक विभागाचे अतिरिक्त महसूल आयुक्त म्हणून जात आहेत.बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल येडगे यांची माहिती तंत्रज्ञान संचालक; मुंबई म्हणून बदली झाली. सहजिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास) वनामथी सी. या धुळे जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ असतील. सहजिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास) अजित कुंभार हे पालघर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ असतील. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सहजिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी (आदिवासी विकास) योगेश कुंभेजकर हे याच पदावर धारणी; जि. अमरावती येथे बदलून जात आहेत.अतिरिक्त जिल्हाधिकारी कॅडरचे असलेले जातपडताळणी समिती; अहमदनगरचे अध्यक्ष पी.टी. वायचळ हे सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ असतील. याच कॅडरचे एस.एम. भागवत (एमएमआरडीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी) हे सातारा जिल्हा परिषदेचे नवे सीईओ असतील. तर याच कॅडरचे यू.ए. जाधव हे पुणे जिल्हा परिषदेचे नवे सीईओ असतील. आतापर्यंत ते जातपडताळणी समिती; पालघरचे अध्यक्ष होते.