नवी मुंबईमध्ये २३ किलो सोन्याची लूट

By admin | Published: August 7, 2016 04:45 AM2016-08-07T04:45:17+5:302016-08-07T04:45:17+5:30

सीवूड येथील पॉप्युलर गोल्ड फायनान्स कंपनीवर शनिवारी दुपारी पाच जणांनी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकत सुमारे २३ किलो सोने व ९ लाख ५० हजारांची रोख

23 kg gold plunder in Navi Mumbai | नवी मुंबईमध्ये २३ किलो सोन्याची लूट

नवी मुंबईमध्ये २३ किलो सोन्याची लूट

Next

नवी मुंबई : सीवूड येथील पॉप्युलर गोल्ड फायनान्स कंपनीवर शनिवारी दुपारी पाच जणांनी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकत सुमारे २३ किलो सोने व ९ लाख ५० हजारांची रोख रक्कम लुटून नेली. त्या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याची संधी साधत हा दरोडा टाकण्यात आला असून, दरोडेखोरांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही चोरून नेला आहे. पोलिसांनी ७ कोटी रुपयांच्या दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे.
सीवूड स्थानकाबाहेरील मुख्य मार्गालगतच फायनान्स कंपनीचे हे कार्यालय आहे. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून पाच जण आले व ते आत कार्यालयात घुसले. तर त्यांचा एक साथीदार गाडीतच बसून होता. या सर्वांनी तोंडावर काळे मास्क घातलेले होते. फायनान्स कंपनीत घुसताच त्यांनी तेथील दोन महिला व तीन पुरुष कामगांराना पिस्तुल व तलवारीचा धाक दाखवला. त्यानंतर पिस्तुलाच्या धाकावरच मॅनेजर वर्गीस यांच्याकडून लॉकरच्या चाव्या मिळवून, त्याठिकाणचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटून नेली. विशेष म्हणजे भर दुपारी साडेतीनच्या सुमारास रहदारीच्या मार्गावर हा दरोडा पडला. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी सर्व ज्वेलर्स व फायनान्स कंपन्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही पॉप्युलर फायनान्स कंपनीने सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता. तर आतमध्ये सीसीटीव्हीची दरोडेखोरांनी तोडफोड करत त्याचा डीव्हीआर चोरून नेला आहे.
दरोडेखोरांनी सुमारे २३ किलो सोने व ९ लाख ५० हजारांची रोख रक्कम लुटल्याचे उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. सुमारे एक हजारांहून अधिक ग्राहकांचे हे सोने असून त्यांनी त्याठिकाणी ते गहाण ठेवले होते. त्यानुसार सुमारे ७ कोटी रुपयांच्या दरोड्याची नोंद एनआरआय पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दरोडेखोर आपापसात मराठीत बोलत होते, अशी माहिती कामगारांनी दिली आहे. एका प्रत्यक्षदर्शीने
त्यांच्या स्विफ्टचा नंबरही लिहून घेतला होता. मात्र तो बनावट असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)

सुरक्षेत हलगर्जीपणा भोवला
मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी तारण ठेवलेले सोने असतानाही पॉप्युलर फायनान्स कंपनीने सुरक्षारक्षक नेमलेला नव्हता.
कार्यालयातील किरकोळ काम करण्यासाठी नेमलेल्या एका कामगारावरच सर्व जबाबदारी सोपवलेली होती. यामुळे पोलिसांनी फायनान्स कंपनीवर सुरक्षेत हलगर्जीपणाचा ठपका ठेवला आहे.

Web Title: 23 kg gold plunder in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.