जमीर काझी , मुंबईस्वातंत्र्य दिन व मुंबई बॉम्बस्फोटातील सिद्धदोष याकूब मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर अतिरेकी हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणेकडून खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. असे असले तरी राज्यातील सागरीसुरक्षा वाऱ्यावर असल्याचेच दिसत आहे. गस्तीसाठीच्या तब्बल २३ बोटी नादुरुस्त असून, वापराविना किनाऱ्यावर पडून आहेत. त्यात केंद्राच्या सहा बोटींचा समावेश आहे.बंद बोटींचा भार उर्वरित बोटींवर येत असून अतिवापरामुळे त्या बोटींमध्येही बिघाड होण्याची शक्यता आहे. पूर्ण राज्याच्या सागरीकिनाऱ्यावर रोज गस्तीसाठी केवळ ३०-३५ बोटींचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईतील तब्बल १४ बोटी तर नवी मुंबईतील ३ बोटी दीड महिन्यापासून बंद आहेत. किनाऱ्यावर पडून असलेल्या काही बोटींच्या स्टार्ट बोर्ड बिघडला आहे, तर काहींचा गीअर बॉक्स नादुरुस्त आहे. काही आॅइल गळतीमुळे बंद पडल्याची माहिती मिळाली. राज्याला ५७० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण सागरीकिनारा लाभला आहे. त्यापैकी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची किनारपट्टी ११४ किमी लांबीची आहे. २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ७ जिल्ह्यांमध्ये नवीन १८ पोलीस ठाणी स्थापन करण्यात आली. सध्या एकूण ३३ सागरी पोलीस ठाणी असून या ठिकाणी ९१ तपासणी नाके (चेकपोस्ट) कार्यरत आहेत. या ठिकाणी गस्तीसाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्व सुविधायुक्त ६९ अद्यावत बोटी स्वतंत्रपणे पुरविण्यात आल्या आहेत. गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्राच्या बोटी १२ व ५ टन वजनाच्या एकूण २८ बोटी आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी केंद्राने परस्पर गोव्याच्या शिपयार्ड कंपनीकडे सोपविली आहे. तर राज्य सरकारच्या १२ मीटर लांबीच्या ७, तर ९.५ मीटर लांबीच्या २२ बोटी असून त्यांची देखभाल शिपयार्ड कंपनीकडून होते. केंद्र व राज्याच्या बोटींशिवाय जुन्या १२ बोटी असून, त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी मोटार परिवहन विभागाकडून (एमटी) केली जाते. सध्या राज्य पोलिसांकडे सागरी तटरक्षणासाठी एकूण ६९ बोटी आहेत. मात्र केंद्राच्या १२ टनांच्या एक व ५ टन वजनाच्या ६ अशा सात तर, राज्याच्या १२ टनांच्या दोन व ५ टनांच्या १० अशा १२ आणि जुन्या ४ बोटी नादुरुस्त आहेत. त्यामुळे सध्या ३२-३५ बोटींचाच वापर केला जातो. देखभालीच्या जबादारीचा निर्णय न झाल्यास नादुरुस्त बोटींची संख्या वाढण्याची भीती वर्तविण्यात आली.
गस्तीच्या २३ बोटी नादुरुस्त !
By admin | Published: August 03, 2015 1:39 AM