मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणात आयपीएस अधिकाऱ्यांसह २३ साक्षीदारांची नावे खटल्यातून वगळावीत, अशी मागणी सीबीआयने न्यायालयाला केली आहे. या २३ जणांमध्ये मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त राकेश मारिया, आयपीएस अधिकारी सत्यनारायण चौधरी, तत्कालीन रायगड पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे यांचा समावेश आहे.
२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. शीनाची आई इंद्राणी हिचा चालक श्यामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे इंद्राणीला २०१५ मध्ये अटक झाली आहे.
पुढील सुनावणी ५ जानेवारीला
पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नाला हत्या आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली तर सीबीआयने कटात सहभागी झाल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली.
इंद्राणी हिला जामीन मिळाला असून, याबाबचा खटला मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे. विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एस. पी. नाईक - निंबाळकर यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी दोन साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात आली.
इंद्राणीला ओळखण्यासाठी सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा त्यांनी केला. शीना बोरा हत्या प्रकरणात २५० साक्षीदार असून, ८६ साक्षीदारांची साक्ष नोंदवून पूर्ण झाली आहे तर २३ साक्षीदारांना वगळण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ५ जानेवारीला होणार आहे.