कासवाच्या २३ हजार ७०६ पिलांना जीवनदान! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 11:01 AM2021-06-18T11:01:15+5:302021-06-18T11:02:19+5:30

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक ठिकाणी सागरी कासवे घरटी करतात. जगातील ७ प्रजातींपैकी ४ प्रजातींच्या भारतीय भूखंडावर आणि अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटांवर घरटी करण्याच्या नोंदी सापडल्या आहेत.

23 thousand 706 turtle chicks got new life | कासवाच्या २३ हजार ७०६ पिलांना जीवनदान! 

कासवाच्या २३ हजार ७०६ पिलांना जीवनदान! 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी कासवांच्या संवर्धनासाठी वेगाने पावले उचलली जात असून, या प्रयत्नांना यश येत आहे. त्यानुसार, २०१९-२० पेक्षा २०२०-२१ मध्ये कासवांच्या घरट्यांत वाढ झाली आहे. ही वाढ किंवा घट कायमस्वरूपी नाही. तरीही कासवांच्या पिल्लांचा विचार करता मागील दोन वर्षांच्या तुलनेत २०२०-२१ या वर्षी कासवांची अधिक पिल्ले पुन्हा समुद्रात सुखरूप सोडण्यात आली असून, हा आकडा २३ हजार ७०६ एवढा आहे.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अनेक ठिकाणी सागरी कासवे घरटी करतात. जगातील ७ प्रजातींपैकी ४ प्रजातींच्या भारतीय भूखंडावर आणि अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटांवर घरटी करण्याच्या नोंदी सापडल्या आहेत. यातील केवळ ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे महाराष्ट्राच्या किनारी घरटी करताना आढळतात. ऑलिव्ह रिडले कासवे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारी भागात घरटी करतात. मात्र कासवांची शिकार केली जाते.

कुत्र्यांकडून कासवाच्या अंड्यांचे नुकसान केले जाते. परंतु यास संरक्षण म्हणून महाराष्ट्र वन विभाग, सह्याद्री निसर्ग मित्र आणि स्थानिकांच्या मदतीने कासव संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माेहिमेअंतर्गत कासव उबवणी केंद्रांची शृंखला महाराष्ट्राच्या किनारी भागांत तयार करण्यात आली. २००६ सालापासून वेळास, आंजर्ले, रत्नागिरी येथे कासव महोत्सवास सुरुवात झाली. २०२० आणि २०२१ मध्ये कांदळवन प्रतिष्ठानने कासव महोत्सवाचे ऑनलाइन आयोजन केले. २०१९ पासून कांदळवन प्रतिष्ठानतर्फे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील किनारी स्वयंसेवकांना मानधन दिले जात आहे.

जनजागृतीवर भर
२०१८ पासून कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठानने राज्याच्या किनारी जिल्ह्यांत जनजागृती कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत स्वयंसेवकांना उबवणी केंद्राची जागा, कासवाची घरटी शोधणे, त्यातील अंडी सुरक्षित उबवणी केंद्रात आणणे आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.
- वीरेंद्र तिवारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन) आणि कार्यकारी संचालक, मॅनग्रोव्हज फाउंडेशन

किनाऱ्यांवर वाहून आलेल्या कासवांच्या नाेंदी
ग्रीन सी, हॉक्सबील, लेदर बॅक, 
सी टर्टल प्रजातींच्या कासवांच्या काही नोंदी महाराष्ट्राच्या किनारी झाल्या आहेत. अद्याप या प्रजातींनी महाराष्ट्राच्या किनाऱ्यांवर घरटी केल्याच्या नोंदी सापडलेल्या नाहीत.

जन्माला आलेल्या कासवांच्या पिल्लांची संख्या
२०१८-१९ : १२ हजार ६०१
२०१९-२० : १२ हजार १४९
२०२०-२१ : २३ हजार ७०६
कासवांची पिल्ले : उबवणी प्रमाण
२०१८-१९ : ५४.५ टक्के
२०१९-२० : ४४.६ टक्के
२०२०-२१ : ४६.७ टक्के
 

Web Title: 23 thousand 706 turtle chicks got new life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.