मुंबई : गर्दीची ठिकाणे, निर्जन स्थळावर हातचलाखीने किमती ऐवज लंपास करणारा सराईत चोर अवघ्या २३० रुपयांच्या चोरीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अस्लम शेख (२५) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईत गुन्हे दाखल असण्याची शक्यता आहे.मालाड पश्चिमेकडील योगेश प्रकाश मांजरेकर (३०) हे रिक्रुटमेंट डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी ९.३०च्या सुमारास त्यांनी कार्यालय गाठले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत ते मोबाइलचे बिल भरण्यासाठी बाहेर पडले. पदपथावरून चालताना शेखने त्यांना धक्का दिला. त्याचवेळी मांजरेकर यांनी शर्टाचा खिसा चाचपडला. खिशातून २३० रुपये गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.शेखनेच ते पैसे चोरल्याचे लक्षात येताच ते ‘चोर चोर’ ओरडू लागले. त्यांच्यासह तेथील लोकांनी शेखच्या मागे धाव घेतली आणि शेखला ताब्यात घेत चोप दिला. त्याचदरम्यान त्याच्यासह अन्य काही तरुणांच्या खिशातील पैसेही गायब असल्याचे निदर्शनास आले.घटनेची वर्दी लागताच मालाड पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी शेखला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीस गेलेले २३० रुपयेही हस्तगत केले. शेख हा मालवणी येथील रहिवासी आहे. त्याने आतापर्यंत आणखी कुठे चोरी केली आहे का, तसेच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे.
२३० रुपयांची चोरी पडली महागात; सराईत चोरटा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:23 AM