CoronaVirus: कोरोनाविरोधी लढ्यात पालिकेचे 2,300 कोटी खर्च; कोरोना केंद्रे, औषधे आदींचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 09:00 AM2021-11-05T09:00:29+5:302021-11-05T09:00:45+5:30
प्रतिबंधक उपाययोजना : कोरोना केंद्रे, औषधे आदी खर्चाचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील दीड वर्षापासून मुंबईत सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महापालिकेने आतापर्यंत दोन हजार तीनशे कोटी रुपये खर्च केले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखणे व अन्य प्रतिबंधक उपाययोजनांसाठी दरमहा सुमारे ११५ कोटी रुपये खर्च करीत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. त्यानुसार आतापर्यंत सात लाख ५६ हजार ७२२ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच बाधित लोकांच्या संपर्कात आल्याने संशयित ८३ लाख २२ हजार नागरिकांचा शोध घेण्यात आला. तसेच एक कोटी १५ लाख ४८ हजार नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. नागरिकांच्या चाचण्या, औषधांचा खर्च, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था, जम्बो कोविड केंद्रांची बांधणी, वॉर्ड वॉर रूमवरून यांची उभारणी, डॉक्टर व परिचारिका यांचे वेतन याचा खर्च या काळात पालिकेने केला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नागरिकांना अन्नधान्याचा पुरवठा, कर्मचाऱ्यांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, यासाठी खर्च करण्यात आले, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ऑक्सिजन निर्मितीत आत्मनिर्भर होण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात आल्याने मुंबईत २६६ विनामूल्य चाचणी केंद्रे, तीन मोठी जंबो कोविड केंद्रे उभारण्यात आली आहेत.
असा झाला खर्च
nरुग्णांची संख्या वाढत गेल्यामुळे मनुष्यबळाचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान महापालिकेने मोठ्या प्रमाणात कंत्राटी डॉक्टर व परिचारिकांना घेतले.
nअत्यावश्यक सेवेत सहभागी कर्मचाऱ्यांसाठी हॉटेलचा खर्च, कोरोनाबाधित भागात खाण्यापिण्याचा पुरवठा, मास्क खरेदी, ऑक्सिजन प्लांट तयार करणे, औषधांची खरेदी यासाठी पालिकेने सुमारे एक हजार ९०० कोटी रुपये खर्च केले आहेत.
nजम्बो कोविड सेंटर, कोरोना काळजी केंद्र यामध्ये खाटांची क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व यंत्रणा सुसज्ज असल्याने आता यापुढे खर्च वाढण्याची शक्यता नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.