Join us

२३ हजार कोटींच्या सागरी प्रकल्पांची मुहूर्तमेढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 9:12 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिटचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रात जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. सागरी व्यापार क्षेत्रात आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते २३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सागरी प्रकल्पांची मुहूर्तमेढ करण्यात आली.

प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर आयोजित तिसऱ्या ‘ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (जीएमआयएस) २०२३’चे उद्घाटन करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, केंद्रीय बंदर व जलवाहतूकमंत्री सर्बानंद सोनोवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ‘फिक्की’चे अध्यक्ष सुभ्रकांत पांडा, तसेच विविध देशांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान म्हणाले, भारत लवकरच जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. सागरी व्यापाराचा मोठा वाटा अर्थव्यवस्थेत आहे. ही परिषद त्यादृष्टीने महत्त्वाची आहे. लवकरच जहाजबांधणीत आपण देशाला आघाडीवर घेऊन जाऊ. ‘मेक इन इंडिया’वर भर दिला जाईल. येणाऱ्या काळात देशात विविध ठिकाणी जहाजबांधणी आणि दुरुस्ती प्रकल्प सुरू केले जातील. देशातील वारसा जपण्याचे काम आपण करत आहोत. त्यादृष्टीने लोथल डॉकयार्ड येथे राष्ट्रीय मेरीटाइम कॉम्प्लेक्स बनवले जाईल.

मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल -मुख्यमंत्री शिंदे२०२४ मध्ये महाराष्ट्र मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू होतेय. याठिकाणी वर्षाला २०० क्रूझ जहाजे आणि १ दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन बंदरेमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

     पंतप्रधानांच्या हस्ते सागरी नील अर्थव्यवस्थेसाठीच्या ‘अमृत काल व्हिजन २०४७’ चे अनावरण करण्यात आले.      २३ हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ करण्यात आली. यातून २१ बंदरांचा कायापालट होणार आहे.     सागरी क्षेत्रात जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीने ७ लाख कोटींहून अधिक किमतीचे ३०० हून अधिक सामंजस्य करार करण्यात आले.