Join us

वानखेडेंच्या घरी मिळाले 23 हजार, नातेवाइकांच्या घरीही छापे, मुलांचे लॅपटॉप जप्त

By मनोज गडनीस | Published: May 14, 2023 11:30 AM

या छापेमारीदरम्यान वानखेडे यांच्या घरातून सीबीआय अधिकाऱ्यांना २३ हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे. छापेमारीची कारवाई तब्बल १७ तास सुरू होती.

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या ओशिवरा येथील घरासह त्यांची बहीण, वडील आणि त्यांच्या पत्नीच्या आई-वडिलांच्या घरीही ‘सीबीआय’च्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. वानखेडे यांच्या घरावर छापेमारी करणाऱ्या पथकामध्ये एकूण १४ अधिकारी होते. या छापेमारीदरम्यान वानखेडे यांच्या घरातून सीबीआय अधिकाऱ्यांना २३ हजार रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे. छापेमारीची कारवाई तब्बल १७ तास सुरू होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी झाली त्यावेळी वानखेडे त्यांच्या चेन्नई येथील कार्यालयामध्ये होते. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी वानखेडे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा मोबाइल तसेच त्यांच्या दोन मुलांचे आयपॅड लॅपटॉप जप्त केले. यादरम्यान क्रांती रेडकर यांचा जबाब सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नोंदविल्याचे समजते. त्यांच्या घरातून जप्त करण्यात आलेली २३ हजार रुपयांची रक्कम वानखेडे यांनी घरखर्चासाठी आणल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. 

चेन्नईतील घराचीही झडती -वानखेडे यांच्या चेन्नईतील कार्यालय तसेच चेन्नईत ते जिथे राहतात तिथेही सीबीआय अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. चेन्नईत ते ज्या घरात भाडेतत्त्वावर राहतात, त्या घरांच्या करारनाम्याच्या प्रतीसह काही कागदपत्रे सीबीआयने ताब्यात घेतल्याचे समजते. 

 वानखेडे यांच्या घरी, बहिणीच्या घरी, आई-वडिलांचे घर तसेच क्रांती रेडकर यांच्या आई-वडिलांचे घर यादरम्यान काही महत्त्वाचे दस्तऐवज मिळाल्याचा दावा सीबीआयचे अधिकारी करीत आहेत.

आर्यन खान प्रकरणात २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर तसेच त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांवर असून, यासंदर्भात शुक्रवारी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे आणि त्यानंतर ही छापेमारी केली आहे. दरम्यान, एनसीबीचा बडतर्फ अधीक्षक विश्व विजय सिंह आणि गुप्तवार्ता अधिकारी आशिष रंजन यांच्या घरी झालेल्या छापेमारीत काही दस्तऐवज मिळाल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :समीर वानखेडे