शहापूरात जिल्हा परिषद , पंचायत समितीसाठी २३४ अर्ज दाखल
By admin | Published: January 13, 2015 10:35 PM2015-01-13T22:35:16+5:302015-01-13T22:35:16+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याकरीता एकच झुंबड उडाली. जि.प. च्या १२ गटांसाठी ९७ व पं.स.च्या २४ गणांसाठी १३७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
शहापूर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याकरीता एकच झुंबड उडाली. जि.प. च्या १२ गटांसाठी ९७ व पं.स.च्या २४ गणांसाठी १३७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेसाठी नडगांव या प्रतिष्ठेच्या गटातून जिल्हा राष्ट्रवादीचे ग्रामीण उपाध्यक्ष दशरथ तिवरे, भाजपचे तालुका अध्यक्ष काशिनाथ भाकरे , कसारा मोखावने गटातून माजी सभापती मंजुषा जाधव, चेरपोली गटातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किसन भांडे यांचे चिरंजीव निलेश भांडे तर याच गटातून शिवसेनेच्या दुफळीला कंठाळून राष्ट्रवादीत आलेले विलास गगे यांनी अर्ज दाखल केले आहेत. स्थानिक स्तरावर राष्ट्रवादीची, कॉंग्रेस व कुणबी सेने सोबत युती झाली असून कुणबी सेनेला शिरोळ व बिरवाडी हे दोन गट सोडण्यात आले आहेत. मनसेलाही सोबत घेण्यासाठी बोलनी सुरु असल्याचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी सांगितले. तर शिवसेनेची भाजपाशी युती करण्या साठी दूसर्या टप्प्यातील बोलनी सुरू असून सेनेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. लवकरच युती होईल असे भाजपा तालुका अध्यक्ष काशिनाथ भाकरे यांनी लोकमतला सांगितले.