मुंबई - महाराष्ट्रात पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा देण्यात यावा, अशा आशयाचे पत्र गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. तसेच, महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनीही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. आता, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही एक कार्टुन शेअर करत, पत्रकार हे फ्रन्टलाईन वर्करच आहेत, असे म्हटले आहे.
कोरोना काळात महाराष्ट्रातील पत्रकार समाज जागृतीचे काम करत आहेत. सातत्याने सरकार करत असलेले प्रयत्नदेखील ते समोर आणत आहेत. ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्यावर अंकुश ठेवण्याचे कामही ते करत आहेत. त्यासाठी त्यांना बाहेर फिरावे लागते. अनेक ठिकाणी जावे लागते. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना आपण फिरण्याची मुभा दिली आहे; मात्र त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे सर्वच पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्करचा दर्जा द्यावा, अशी मागणी गृहमंत्र्यांनी आपल्या पत्रात केली आहे. आता, संजय राऊत यांनीही ट्विटरवरुन मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मेन्शन करत पत्रकारांचा मुद्दा उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी कार्टुनिस्ट सतिश आचार्य याचं कार्टुन शेअर केलं आहे. या कार्टुनमध्ये आत्तापर्यंत 235 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. तसेच, मी ही बातमी पूर्ण करूच शकत नाही, कारण बातमी लिहून पूर्ण होईपर्यंत मृत्यूचा आकडा बदललेला असतो, असा मार्मिक टोलाही या चित्रातून लगावण्यात आलाय.
रामदास आठवलेंनीही केली मागणी
पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षा महाविकास आघाडी सरकारने करू नये. राज्यातील पत्रकारांना कोरोना योध्याचा दर्जा देऊन त्यांचा सन्मान राखावा. महाराष्ट्रात कोरोनाच्या बिकट काळात 124 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने सांत्वनपर मदत केली पाहिजे. पत्रकारांना कोरोना योद्ध्याचा दर्जा देऊन त्यांना लसीकरणा मध्ये प्राधान्य द्यावे तसेच कोरोनामुळे पत्रकारांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला सांत्वनपर 50 लाख रुपये मदत निधी द्यावा त्यासाठी कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांना दर्जा द्यावा अशी मागणी ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.