मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज पुन्हा 23 हजार 819 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आज वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे एकूण रुग्णांची संख्या 9,67,349 एवढी झाली आहे. त्यापैकी, 6,86,462 रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थिती 2.5 लाख रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे मिशन बिगेन अगेन सुरू झाले आहे. मात्र, दुसरीकडे रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे.
ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात नियंत्रणात आलेल्या राज्यातील कोरोना प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. १ ते ५ सप्टेंबर या 5 दिवसांच्या कालावधीत राज्यात तब्बल 91 हजार 10 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात दररोज साधारणपणे 20 हजारांच्या जवळपास दररोज रुग्ण वाढत आहेत. सध्या राज्यात 2.52,734 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
SMS आवश्यक, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक
कोरोनासोबत जगावं लागेल, मग काही ठिकाणी गर्दी टाळणे अशक्य असते, त्याठिकाण कसं जगायचं? असा प्रश्न आरोग्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना कोरोनावरील लस येईपर्यंत आपल्याला काही बंधन घालावीच लागणार आहेत. लॉकडाऊन हे पॉझ बटण होतं, त्यामुळे कोरोनासोबत लढण्याची तयारी आपल्याला करता आल्याचे राजेश टोपेंनी म्हटले.
SMS म्हणजे नेमकं काय विचारलं असता, एस म्हणजे सोशल डिस्टन्स, एम म्हणजे मास्क आणि एस म्हणजे सॅनिटायझेशन या बाबींचा अवलंबन आपल्याला जगण्यात करावा लागणार आहे, असे टोपे यांनी सांगितलं. प्रत्येकाने आपली नोकरी करावी, व्यवसाय करावा पण एसएमएस पद्धतीचा वापर करावा, कुणालाही काही होणार नाही. फक्त को मॉर्मिड व सिनियर सिटीझन्सने अधिक काळजी घ्यावी, असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी दिलाय. नागरिकांना स्वत:हून स्वत:ला शिस्त लावायला हवी. गरज असेल तरच सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जावे. काय करावे, काय नाही करावे हे आपण ठरवायला हवे. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक... असल्याचंही राजेश टोपेंनी म्हटले आहे.