मुंबई : लॉकडाऊनमुळे उत्पन्नात मोठी घट झाली असताना आता डिझेल दरवाढीनेही बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित बिघडले. २,९८४ पैकी ११४९ गाड्या डिझेलवर चालत असल्याने बेस्ट उपक्रमावर वार्षिक २४ कोटींचा बोजा पडेल.
बेस्ट उपक्रमाने बस भाड्यात जुलै २०१९ मध्ये मोठी कपात केली. यामुळे उत्पन्नात घट झाली, मात्र प्रवासी संख्या १७ लाखांवरून ३४ लाखांवर पोहोचल्यामुळे उत्पन्न हळूहळू वाढू लागले. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले व बेस्टचे उत्पन्नही बंद झाले होते. ‘पुनश्च हरिओम’अंतर्गत ३ जूनपासून बसने प्रवासी पुन्हा प्रवास करू लागले. लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असल्याने बेस्ट प्रवासी वाढत आहेत. परंतु डिझेल दरवाढीने बेस्ट उपक्रमावर दरमहा दोन कोटी अतिरिक्त भार वाढेल, असे बेस्ट उपक्रमातील सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, एक बस रोज सुमारे दोनशे किमी धावते. रोज सरासरी ७० हजार लीटर डिझेल वापरले जाते. बेस्टच्या २,८५४ बसमधून शुक्रवारी ८,२६,७२५ प्रवाशांनी प्रवास केला. यातून ७६ लाख ६४ हजार ९५८ उत्पन्न मिळाले.