Join us

‘वेंकटेश्वरा हॅचरीज’ची २४ कोटींची मालमत्ता जप्त; महिनाभरातच ईडीचा कंपनीला दुसरा दणका  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 3:14 PM

परदेशी चलन विनियम कायद्याचा भंग केल्याच्या दुसऱ्या एका प्रकरणात ४ सप्टेंबर रोजी ईडीने कंपनीची ६५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

मुंबई : गेल्या १३ वर्षांमध्ये तब्बल १,९६० कोटी रुपये परदेशातील स्वतःच्या उपकंपनीला पाठवताना परदेशी चलन विनिमय कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वेंकटेश्वरा हॅचरीज कंपनीची २४ कोटी ६४ लाख रुपयांची मालमत्ता मंगळवारी जप्त केली आहे. 

  परदेशी चलन विनियम कायद्याचा भंग केल्याच्या दुसऱ्या एका प्रकरणात ४ सप्टेंबर रोजी ईडीने कंपनीची ६५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. त्यानंतर महिनाभरातच ईडीने कंपनीला हा दुसरा दणका दिला आहे, पुणेस्थित या कंपनीने यूकेमधील कार्डिफ येथे मे. वेंकीज लंडन लि. ही उपकंपनी २०१० मध्ये स्थापन केली. त्या कंपनीत गुंतवणूक करण्याच्या नावाखाली  भारतातून त्या कंपनीत पैसे गुंतवले. 

विनिमय कायद्याचा भंग- यूकेमध्ये स्थापन केलेली ही कंपनी तेथे फुटबॉल क्लब चालविणार असल्याची माहिती कंपनीने भारतीय रिझर्व्ह बँकेला दिली होती. मात्र, संबंधित फुटबॉल क्लबला सातत्याने तोटा होत असूनही मूळ कंपनीद्वारे उपकंपनीत नियमितपणे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत होती. याखेरीज, कंपनीने कॅनडास्थित कंपनीत देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. - या कंपनीमध्ये अमेरिकेतील प्रसिद्ध गायक अकॉन याची देखील गुंतवणूक आहे. या गायकाने कंपनीचे प्रवर्तक बी. बालाजी राव यांच्या वाढदिवशी गाण्याचा कार्यक्रम देखील पुण्यात सादर केला होता. २०२३ पर्यंत परदेशात केलेल्या गुंतवणुकीमध्ये परदेशी चलन विनिमय कायद्याचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयमुंबई