केईएम प्रशासनाला २४ तासांचा ‘अल्टीमेटम’
By Admin | Published: December 5, 2014 01:28 AM2014-12-05T01:28:51+5:302014-12-05T01:28:51+5:30
केईएम रुग्णालयातील कर्मचारी आणि कामगार वर्गाने गुरुवारी काम बंद आंदोलन करुन रुग्णसेवा खंडित केली
मुंबई : केईएम रुग्णालयातील कर्मचारी आणि कामगार वर्गाने गुरुवारी काम बंद आंदोलन करुन रुग्णसेवा खंडित केली. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी प्रशासनाविरोधात हा आवाज उठवण्यात आला. या मागण्यांसंदर्भात कामगार संघटनेने रुग्णालय प्रशासनाला चोवीस तासांचा ‘अल्टीमेटम’ दिला आहे. मात्र तरीही रुग्णालय प्रशासनाने दाद न दिल्यास महापरिनिर्वाणदिनी केईएम, शीव आणि नायर रुग्णालयात एकत्रितरित्या काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, केईएममधील रुग्णसेवेला दिवसभर मोठा फटका बसला.
गणवेशांची कमतरता, सेवाज्येष्ठतेनुसार मस्टरवर नोंदणी, वेतन कराराची थकबाकी, सेवाज्येष्ठता लागू असणाऱ्या परिचारिकांना रात्रपाळी नको, पदोन्नती अशा अनेक समस्यांनी केईएम रुग्णालयातील कर्मचारी आणि कामगार वर्ग त्रस्त आहे. याविषयी गुरुवारी तब्बल सहा तास रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करुन यावर ठोस तोडगा निघत असल्याने रुग्णालय प्रशासनाला २४ तासांची मुदत दिल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस महेश दळवी यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी प्रशासनाविरोधात रुग्णालयात लावलेले निषेधाचे फलक सुरक्षारक्षकांनी ‘गायब’ केले होते. ते फलकही गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर पूर्ववत रुग्णालयाच्या आवारात लावण्यात आले. तसेच, येत्या चोवीस तासांत किमान मस्टरवर सेवाज्येष्ठतेनुसार नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. नोव्हेंबर २०१३ साली केईएम प्रशासनाने सेवाज्येष्ठतेनुसार नाव लिहिण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय वर्ष उलटूनही केवळ कागदावरच आहे. त्यामुळे याविरोधात कामगार संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले. त्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.केईएम रुग्णालयाच्या प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही त्यांचा गांभीर्याने विचार करण्यात आला नाही. आम्हाला काम बंद आंदोलन करुन वैद्यकीय सेवेचे नुकसान करुन रुग्णसेवेला धक्का पोहोचवायचा नाही. मात्र आता तरी प्रशासनाने मागण्यांसंदर्भात त्वरित विचार करुन अंमलबजावणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दळवी यांनी केले. (प्रतिनिधी)