मुंबई : महानगरपालिकेच्या पिसे येथील जल उदंचन केंद्रात संयंत्राला सोमवारी आग लागली. या घटनेमुळे मुंबई पूर्व उपनगरांमधील पूर्वेचा भाग तसेच शहर विभागातील गोलंजी, फोसबेरी, रावळी तसेच भंडारवाडा जलाशयांमधून होणारा पाणीपुरवठा बाधित झाल्यामुळे या भागांमध्ये पुढील २४ तास पाणीपुरवठा होणार नाही.
पिसे येथे महापालिकेचे जल उदंचन केंद्र आहे. सायंकाळी येथील क्रमांक दोन ट्रान्सफार्मरला आग लागल्याने संपूर्ण प्रकल्पातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. परिणामी सर्व पंप बंद झाले आहेत. घटनास्थळी आग आटोक्यात आल्यानंतर संयंत्र दुरुस्ती करुन उदंचन केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर हाेणार. त्यामुळे संबंधित भागांमधील नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.