मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर राहणार २४ तास सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 07:48 AM2022-11-30T07:48:42+5:302022-11-30T07:50:01+5:30

१ डिसेंबरपासून प्रारंभ : १२ पथकांची निर्मिती

24 hours security on Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर राहणार २४ तास सुरक्षा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर राहणार २४ तास सुरक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर, तसेच मुंबई-पुणे (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८) येथे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. त्यानुसार या मार्गांवर अपघातांना रोख लावण्यासाठी परिवहन विभाग विविध उपक्रम राबविणार आहे. त्यानुसार दोन्ही महामार्गांवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ६ महिन्यांसाठी २४ तास सुरक्षा असेल. या उपक्रमाची सुरुवात १ डिसेंबरपासून होत आहे. 

यामध्ये मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी- चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमधून १२ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात ३० अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील ६ पथके व १५ अधिकारी हे प्रत्येकी या दोन्ही महामार्गांवर २४ तास कार्यरत राहणार आहेत. या  उपायोजनांमध्ये अपघातग्रस्त ठिकाणांचे  सर्वेक्षण करणे व उपाययोजना करणे, अपघात प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करणे व  योग्य त्या उपाययोजना करणे, अवैधरीत्या रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई, दोन्ही महामार्गांवरील टोल नाक्यावर उद्घोषणा करून जनजागृती निर्माण करणे, इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई, उजव्या मार्गिकेत कमी वेगाने चालणारी वाहने  ट्रक, बस, कंटेनर यांच्या विरुद्ध कारवाई, चुकीच्या पद्धतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई, विनाहेल्मेट, विना सीटबेल्ट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई या बाबींचा समावेश आहे.

नियमांचे पालन करावे
रस्त्यावरील अपघातांचे शास्त्रीय विश्लेषण केले असता त्यामध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त अपघात हे चालकांच्या निष्काळजीपणा, बेफिकीर वृत्ती व वाहतूक नियमांचे पालन न करणे यामुळे होत असतात असे दिसून आले आहे. रस्त्याचा वापर करणाऱ्या सर्व चालक व नागरिक यांनी स्वतःहून नियमांचे पालन करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.

Web Title: 24 hours security on Mumbai-Pune Expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.