Join us

फॅशन स्ट्रीटवरील स्टॉल्सधारकांना २४ तासांची मुदत

By admin | Published: May 23, 2017 2:32 AM

स्वस्त व मस्त कपडे मिळवून देणारे चर्चगेटजवळील फॅशन स्ट्रीट हे फॅशनप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण. मात्र या फॅशन स्ट्रीटवर महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वस्त व मस्त कपडे मिळवून देणारे चर्चगेटजवळील फॅशन स्ट्रीट हे फॅशनप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण. मात्र या फॅशन स्ट्रीटवर महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय न करता सर्रासपणे रस्त्यावरच कपड्यांची विक्री सुरू असते. अशा ४९ बेकायदा आणि अतिक्रमण करणाऱ्या स्टॉल्सधारकांना पालिकेने सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसद्वारे स्टॉलधारकांना २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरही मागे न हटणाऱ्या स्टॉल्सवर मंगळवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.फॅशन स्ट्रीटवरील ३९४ स्टॉलधारक नियमांचे उल्लंघन करीत असल्याने महापालिकेने या विभागाची पाहणी केली होती. त्यापैकी ४९ स्टॉलधारकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले. या अतिक्रमणास नोटीस दिल्यानंतरही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. २३ जानेवारी रोजी पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फॅशन स्ट्रीटची पाहणी केली असता, दुकानदारांनी काहीच सामान हटवले नसल्याचे निदर्शनास आले. या स्टॉलधारकांचा परवाना १९ मे राजी पालिकेने रद्द केला. त्यानंतर त्यांना २४ तासांत रस्त्यावरील संपूर्ण लाकडी साहित्य हटवून पदपथ मोकळे करण्याची लेखी सूचना पालिकेने केली. अखेरीस शनिवारी परवाना विभागाने त्यांचे साहित्य जप्त करण्याचा निर्णय घेतला. मात्र अधिकारी व कर्मचारी तेथे पोहोचले असता स्टॉल्सधारकांनी त्यांना गराडा घालून कारवाई करू दिली नाही. पोलीस बंदोबस्तातही पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना या स्टॉलधारकांवर कारवाई करता आलेली नाही. त्यामुळे या स्टॉलधारकांना पालिकेने २४ तासांची मुदत दिली आहे. या २४ तासांत स्टॉलधारकांनी आपले साहित्य न हटवल्यास मंगळवारपासून पालिकेच्या पथकाकडून या स्टॉलधारकांवर पोलीस बळाचा वापर करीत कारवाई केली जाणार आहे.