Join us

24 तास स्टिअरिंगवर; लेकरांना कधी भेटता? कुटुंब आणि कामाचा ताळमेळ साधताना कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 3:13 PM

आयुष्य कितीही खडतर असले तरी कुटुंबाच्या आनंदासाठी वेळ काढावा लागतो. कुटुंब आणि  काम  असा ताळमेळ ट्रकचालकांना साधावा लागतो.

मुंबई :  ट्रकचालकांचे आयुष्य दगदगीचे असते. त्यांचे हात अक्षरश: २४ तास स्टिअरिंगवर असतात. अशा वेळी त्यांना जिवाची भीती वाटत नाही का? आरोग्याची काळजी कशी घेता? असे अनेक प्रश्न ट्रकचालकांच्या आयुष्याकडे बघून मनात येतात.  आयुष्य कितीही खडतर असले तरी कुटुंबाच्या आनंदासाठी वेळ काढावा लागतो. कुटुंब आणि  काम  असा ताळमेळ ट्रकचालकांना साधावा लागतो.ट्रकच्या धावत्या चाकांवर चालक आणि क्लिनरचे जीवन असते. कुटुंबापासून शेकडो, हजारो कि.मी. अंतरावर दूर जाऊन विशिष्ट दिवसांनी ते घरी परततात. त्यांची परतण्याची वेळ निश्चित नसते. कुटुंबीयांपासून दूर देशभर त्यांचा प्रवास सुरू असतो. रात्रभर ट्रक चालवायचा. सकाळी धाब्यावरच अंघोळ आणि जेवण करायचे, थोड़ा आराम केला की पुढच्या प्रवासाला निघायचे.

कुटुंबासाठी  वेळ देता येत नाही.  घर चालविण्यासाठी पैसा कमवावा लागतो. त्यांच्या आयुष्याची कुटुंबीयांना सवय झाली. जे आयुष्य मिळाले आहे, त्यावरच समाधान मानायचे. - शिमा वारे, चालक पत्नी

कुटुंबाला हातभार लागावा म्हणून आम्ही मिळेल तो व्यवसाय करतो. महागाई खूप वाढल्याने  पतीला बाहेर जावेच लागते. आता सवय झाली आहे. त्यांनाही समजून घेतले पाहिजे.- सोनी बागर, चालक पत्नीरस्त्यावरील जीवन सोपे नाही. जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रस्त्यावर खूप वाईट अनुभव येतात. स्वतःसोबत वाहन व मालाची सुरक्षा करावी लागते.- मच्छिंद्र बागर, चालक

रस्त्यावर चालताना गाडी खराब होते, टायर पंक्चर होतात. रात्री-बेरात्री कुठेही गाडी थांबवावी लागते. लगेच मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत सेवा देणारे जास्त पैसे आकारतात. गाडीची सुरक्षा, मालाची सुरक्षा हे सर्व बघावे लागते. टोलनाक्यावर मशिन बंद आहे, वाहनांची रांग आहे असे सांगून रोख स्वरूपात दुपटीने पैसे घेतात. रस्त्यांवरून सरकार कोटी रुपये कमावत आहे. त्यामुळे दर १०० कि.मी.ला ट्रकचालकांसाठी मदत केंद्र असायला हवे. - नवनाथ वारे, चालक

टॅग्स :परिवारनोकरी