Join us  

२४ तास पाण्याचे केवळ आमिषच ?

By admin | Published: October 13, 2014 1:05 AM

शहराला सध्या आवश्यक असलेला १५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केवळ ११६ दशलक्ष लीटरवर दररोज स्थिरावत आहे. मुंबईला लागून असलेल्या या पश्चिम उपनगरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे

राजू काळे, भार्इंदरमीरा-भार्इंदर शहरांत पाण्याची समस्या गंभीर असून आजही अपुरे पाणी मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत या समस्येची टिंगल विविध पक्षांच्या उमेदवारांनी करण्यास सुरुवात केल्याने पुरेशा पाणीपुरवठ्याऐवजी थेट २४ तास पाण्याचे आमिष मतदारांना दाखवून प्रचाराचा अनपेक्षित फंडा सुरू केल्याने मतदारांत नाराजी पसरली आहे.शहराला सध्या आवश्यक असलेला १५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केवळ ११६ दशलक्ष लीटरवर दररोज स्थिरावत आहे. मुंबईला लागून असलेल्या या पश्चिम उपनगरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. आजमितीस शहराची लोकसंख्या १२ लाखांवर गेली आहे. पुढील ५ वर्षांत त्यात सुमारे ५० ते ७५ हजार लोकसंख्येची वाढ अपेक्षिण्यात येत आहे. शहरात शासनाच्या माध्यमातून नवनवीन गृहप्रकल्प राबविले जात आहेत. त्यामुळे सध्याच्या लोकसंख्येत सुमारे २० ते २५ हजार लोकसंख्येची भर पडल्याने अगोदरच शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असताना ही समस्या आणखी गंभीर होणार आहे. राज्य शासनाने २०१२ मध्ये एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) च्या कोट्यातून २० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मंजूर केले असतानाही हे पाणी तांत्रिक समस्येत अडकल्याने ते अद्याप मिळालेले नाही. तत्पूर्वी राज्य शासनानेच शहराला मंजूर केलेले १०० दशलक्ष लीटर पाणी गेल्या कित्येक वर्षांपासून जलवाहिनीतून वाहू शकलेले नाही. अलीकडेच एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मार्फत सूर्या धरणातून ३०५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत असून त्यातील ११८ दशलक्ष लीटर पाण्यासह राज्य शासनाने मंजूर केलेले १०० दशलक्ष लीटर असे एकूण २१८ दशलक्ष लीटर पाणी शहरात येणार आहे. परंतु, ही योजना अद्याप केंद्राच्या लालफितीत अडकल्याने त्याला मोठा विलंब लागणार आहे. असे असतानाही या निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार केवळ ११६ दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध असतानाही शहराला २४ तास पाणी देण्याचे आमिष दाखवून मतदारांची दिशाभूल करीत असल्याचे दस्तुरखुद्द मतदारांच्याच ध्यानी येऊ लागले आहे. शहरात पाण्याची गंभीर समस्या असतानाही हा प्रचार सुरू झाल्याने मतदारांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़