अपुऱ्या जलसाठ्यामुळे ‘२४ तास’ पाणी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:58 AM2019-02-14T03:58:13+5:302019-02-14T03:58:29+5:30
तलावांची पातळी कमी झाल्यामुळे मुंबई महापालिकेचा २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पही अडचणीत आला आहे. या प्रकल्पाचा प्रयोग सुरू असलेल्या एच पश्चिम विभागात २४ तास सोडाच नियमित पाणी मिळणेही कठीण झाले आहे.
- शेफाली परब-पंडित
मुंबई : तलावांची पातळी कमी झाल्यामुळे मुंबई महापालिकेचा २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पही अडचणीत आला आहे. या प्रकल्पाचा प्रयोग सुरू असलेल्या एच पश्चिम विभागात २४ तास सोडाच नियमित पाणी मिळणेही कठीण झाले आहे. अपुºया जलसाठ्यामुळे स्थानिक रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या प्रकल्पाच्या यशाबाबत साशंकता व्यक्त होत आहे़ सत्ताधारी शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बासनात गुंडाळले जाण्याची शक्यता आहे.
मुंबईत दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते़ या प्रकल्पावर २०१४ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू होऊन एच पश्चिम (वांद्रे, खार, सांताक्रुझ) आणि टी (मुलुंड) या दोन विभागांची प्रयोगासाठी निवड करण्यात आली. या विभागातील यशानंतर हा प्रकल्प संपूर्ण मुंबईत अंमलात आणण्यात येणार होता. या प्रकल्पाची डेडलाइन २०१९ आहे़ २०१७ मध्ये शिवसेनेने आपल्या वचननाम्यातून तशी घोषणाही केली.
गेल्या चार वर्षांत या दोन विभागांमध्ये हा प्रकल्प यशस्वी झाल्याचे पालिकेला छातीठोकपणे सांगता आले नाही. अपुरा पाऊस, तलावांमध्ये जलसाठ्यात घट, यामुळे पाणीपुरवठ्याचे तास वाढविणे पालिकेला शक्य नाही. मधल्या काळात मुलुंडमध्ये काही ठिकाणी, तसेच एच पश्चिम विभागात एक-दोन ठिकाणी नियमित पुरवठ्यापेक्षा जास्त वेळ पाणी मिळत होते. तेही सध्या शक्य नसल्याचे जल अभियंता खात्यातील सूत्रांनी सांगितले.
सध्या १० टक्के कपात
जलसाठा कमी असल्यामुळे मुंबईत सध्या दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठ्याची वेळ वाढविण्यात येणार आहे.
२०१४ मध्ये या प्रकल्पावरील कामाला सुरुवात झाली. ३०० कोटी रुपयांची तरतूद व २०१९ पर्यंतची डेडलाइन निश्चित करण्यात आली.
एच पूर्व (वांद्रे, खार, सांताक्रुझ), टी (मुलुंड) या विभागात २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग सुरू आहे.
एच पश्चिम विभागात २४ तास पाणीपुरवठ्याचा प्रयोग सध्या बंद आहे. हा प्रकल्प फेल गेल्याचे पालिकेने आता जाहीर करावे. डोंगराळ भाग, वितरण व्यवस्थेच्या टोकाला असलेले परिसर, गावठाण या भागात कमी दाबाने पुरवठा होत आहे.
- आसिफ झकारिया, नगरसेवक