मुंबई - जे जे रुग्णालयाच्या वादग्रत क्लिनिकल ट्रायलप्रकरणी आतापर्यंत २४ डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे. आणखीही काही डॉक्टरांची चौकशी बाकी असून, लवकरच त्यांना चौकशीसाठी समितीसमोर बोलविले जाणार आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या देणगी समितीच्या तिजोरीत महसूल जमा होण्यास सुरुवात झाली आहे. क्लिनिकल ट्रायलप्रकरणी चौकशी करणाऱ्या समितीसमोर रुग्णालयाच्या महसुलासंदर्भातील माहिती डॉक्टरांनी नियमबाह्य पद्धतीने या ट्रायलमध्ये सहभाग घेतला आहे का, याची माहिती काढणे हे दोन मूलभूत विषय आहेत.
९ जुलै रोजी लोकमत'मध्ये 'जे जे रुग्णालयात जमा होतोय महसूल' या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये चौकशी समिती जे जेचा बुडविलेल्या महसूलप्रकरणी शोध घेत होती. त्यानंतर, ६० लाखांपेक्षा अधिक महसूल जमा झाल्याचे सांगण्यात आले होते. पाच वर्षांनंतर प्रशासनाच्या तिजोरीत महसूल जमा होत असल्याने, या प्रकरणात आणखी खोलवर तपास करण्यात येत आहे. डॉक्टरच्या चौकशीतून काही कागदपत्रे चौकशी समितीला मिळाली आहेत. त्यामधील माहिती पडताळण्याचे काम सुरू असून, त्या अनुषंगाने आणखी माहिती गोळा केली जात आहे.
क्लिनिकल ट्रायल किंवा कॉर्पोरेट कंपनीच्या सीएसआरमधून मिळणारा फंड हा देणगी समितीच्या खात्यात जमा केला जातो. त्यानंतर, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या सूचनेवरून तो योग्य त्या कारणाकरिता खर्च केला जातो. गेल्या पाच वर्षे सुरू असलेल्या या क्लिनिकल ट्रायलप्रकरणी जे जे रुग्णालयाच्या प्रशासनाने समिती नेमली आहे. त्यामध्ये डॉ. अमिता जोशी यांच्या अध्यक्षेतेखाली ही समिती काम करणार असून, त्यामध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. संजय सुरासे यांचा समावेश आहे.